गोल्ड कोस्ट : केवळ १५ वर्षे वयाचा भारतीय नेमबाज अनिश भानवाला याने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरीसह येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकले. सुवर्णमय कामगिरी करणारा देशातील तो सर्वांत युवा खेळाडू बनला. अनुभवी नेमबाज महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेतील तेजस्विनीचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे.अनिशने पदार्पणात पुरुषांच्या ३५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात नव्या विक्रमासह सुवर्णावर नाव कोरले. त्याने एकूण ३० गुण नोंदविले. त्यात प्रत्येकी पाच गुणांची चारवेळा नोंद केली. ५० मी. रायफल थ्री पोजिशन प्रकारात विक्रमी कामगिरीसह ३७ वर्षांच्या तेजस्विनीने ४५७.९ गुणांची कमाई करीत प्रतिस्पर्ध्यांना मागे सोडले. काल तेजस्विनीने ५० मी. रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदक जिंकले होते.तेजस्विनी व्यतिरिक्त भारताच्या अंजुम मुंदिलने रौप्यपदकाची कमाई केली. अंजुमने ४५५.७ गुणांची नोंद केली. श्रेयसीसिंग महिलांच्या ट्रॅप प्रकारात पाचव्या स्थानी राहिली. नीरज कुमार हा पात्रता फेरीतच बाहेर पडला. भारतीय पथकासाठी आजचा दिवस ‘कही खुशी कही गम’ असा राहिला. खेळाचा विचार करता आजचा दिवस भारतासाठी सर्वांत चांगला ठरला. भारताने तीन सुवर्ण, तीन रौप्य व चार कांस्यपदकांची कमाई केली, पण चालण्याच्या शर्यतीत सहभागी होणारा खेळाडू इरफान व तिहेरी उडीपटू राकेश बाबू यांना मायदेशी परत पाठविण्याच्या आदेशामुळे भारतीय पथकात निराशा पसरली.भारताची एकूण पदकसंख्या ४२ वर पोहोचली आहे. त्यात १७ सुवर्ण, ११ रौप्य व १४ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताने २०१४ ग्लास्गो स्पर्धेत १५ सुवर्णपदके पटकावली होती. (वृत्तसंस्था)>तीन मुष्टीयोद्धांचे कांस्यआशियाडचा पदक विजेता विकास कृष्ण(७५ किलो) आणि सतीश कुमार(९१ किलोपेक्षा अधिक) यांच्यासह पाच भारतीय बॉक्सर राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेच्या बॉक्सिंग प्रकारात अंतिम फेरीत दाखल झाले. त्याचवेळी,अन्य तीन बॉक्सर कांस्य पदकाचे मानकरीठरले आहेत.विकास व सतीश यांच्याशिवाय अमित पांघल(४९), गौरव सोळंकी(५२) व मनीष कौशिक(६०) यांनीही अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे नमन तंवर(९१), मनोज कुमार(६९) आणि मोहम्मद हसमुद्दीन(५६) यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. हसमुद्दीनला इंग्लंडचा पीटर मॅक्ग्रेलकडून ०-५ ने आणि मनोजला इंग्लंडचाच पॅट मॅककोमॅककडून पराभवाचा फटका बसला. नमन आॅस्ट्रेलियाचा जेसन वाटले याच्याकडून पराभूत झाला.सतीशने सेशेल्सचा कॅडी एजनेस याचा सहज पराभव केला. विकासने उत्तर आयर्लंडचा स्टीव्हन डेनेलीवर ५-० ने विजय साजरा केला. मनीषने उत्तर आयर्लंडचा जेम्स मॅकग्रिवन याचा ४-१ ने पराभव करीत अंतिम फेरी गाठली. विजयानंतर तो म्हणाला,‘मी आॅस्ट्रेलियाच्या प्रतिस्पर्धी बॉक्सरविरुद्ध खेळणार आहे. त्याच्या चुकांवर लक्ष ठेवण्याची सूचना कोचने मला केली आहे. मी सुवर्ण पदकासाठीच खेळणार.’>पुरुष हॉकी संघाचा न्यूझीलंडकडून पराभवभारतीय पुरुष हॉकी संघ नऊ पैकी आठ पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित अपयशी ठरताच आणि बाचवफळीतील उणिवा चव्हाट्यावर येताच राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात शुक्रवारी न्यूझीलंडकडून २-३ ने पराभूत झाला. या पराभवासह भारतीयांचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले. भारताला आता कांस्यसाठी खेळावे लागेल.न्यूझीलंडकडून पहिल्या तीन क्वार्टरमध्ये ह्यूगो, स्टीफन जेनेस आणि मार्कस् चाईल्ड यांनी गोल केले. भारताचे दोन्ही गोल हरमनप्रीतसिंग याने केले. त्याने एकदा पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रूपांतर केल्यानंतर आठव्या पेनल्टी कॉर्नरवर पुन्हा गोल नोंदविला.भारताच्या बचावातील उणिवांचा लाभ घेत न्यूझीलंडने आघाडी दुप्पट केली. भारतीय खेळाडूंनी ३२ वेळा प्रतिस्पर्धी डी मध्ये प्रवेश केला, पण गोल नोंदविण्यात मोक्क्याच्या क्षणी त्यांना अपयश आले. न्यूझीलंडची बचाव फळी भेदणे एकाही भारतीयाला जमले नाही. अनुभवी एस.व्ही. सुनील याने तिसऱ्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नर मिळविला पण त्यावरही भारतीय खेळाडू अपयशी ठरले. (वृत्तसंस्था)>महिलांची आज लढतउपांत्य लढतीत यजमान आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघ शनिवारी कांस्य पदकासाठी इंग्लंडविरुद्ध झुंज देईल. साखळी सामन्यात भारताने इंग्लंडचा २-१ ने पराभव केला होता. दुसरीकडे उपांत्य सामन्यात इंग्लंड संघ न्यूझीलंडकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत झाल्यानंतर भारताला कडवे आव्हान देण्याची शक्यता आहे. कांस्य जिंकून मोहिमेची सांगता करायची इच्छा भारतीय कर्णधार राणी रामपाल हिने व्यक्त केली. या पदकामुळे भविष्यातील स्पर्धांमध्ये आत्मविश्वास उंचावेल, असेही राणी म्हणाली.>सुवर्णपदक जिंकल्यावर मी पोडीयमवर उभी होते... तिरंगा डोळ्यासमोरुन वर चढत होता... राष्ट्रगीताची धून सुरु झाली आणि सारेच मानवंदना देण्यासाठी उभे राहीले... त्यावेळी जो उर भरून आला तो शब्दांत व्यक्त करता येणार नाही. सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद आहेच, पण त्यापेक्षा जास्त आनंद आपण भारतासाठी काही तरी करू शकलो, याचा आहे. कारण जेव्हा राष्ट्रगीताच्या वेळी लोकं उभी राहीली, तेव्हा अभिमान वाटला. माझ्या कामगिरीने देशाचे नाव उंचावले जाते, या सारखा आनंद जगात कुठलाच नाही. - तेजस्विनी सावंत>मला पदकाची पूर्ण आशा होती. कारण अन्य स्पर्धांमध्ये माझी कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. स्पर्धेचे नाव बदलत असले तरी निकाल मात्र तोच कायम राखला.- अनिश भानवाला, सुवर्ण विजेता>हे सुवर्ण माझ्या करिअरमधील प्रगतीचे प्रतीक आहे. याआधी राष्टÑकुलमध्ये मी रौप्य जिंकले होते. आज येथे चार लढती खेळण्यासाठी खूप चांगली तयारी केली होती. माझा दिवस असल्याने लवकर लढत संपविल्याचा आनंद आहे. - बजरंग पुनिया>बजरंगला सुवर्णगोल्ड कोस्ट : बजरंग पुनिया याने ६५ किलो वजन गटात लौकिकाला साजेशी कामगिरी करीत शुक्रवारी राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेच्या कुस्ती प्रकारात सुवर्णमय कामगिरी केली. मौसम खत्री आणि पूजा ढांडा यांना मात्र रौप्यावर समाधान मानावे लागले. भारताने आजच्या चारही गटात पदके जिंकली.दिव्या काकरानने महिलांच्या ६८ किलो गटात कांस्य जिंकताच भारताला कुस्तीत तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य अशी आठ पदकांची कमाई झाली. बजरंगपूर्वी काल सुशील कुमार आणि राहुल आवारे यांनी सुवर्ण पदके जिंकली होती.आॅलिम्पिक कांस्य विजेता योगेश्वर दत्तचा शिष्य हरियाणाच्या २४ वर्षांच्या बजरंगला प्रतिस्पर्धी मल्लाला नमविण्यासाठी जोर लावावा लागला नाही. त्याने वेल्सच्या केन चॅरिंगवर १०-० असा तांत्रिक विजय नोंदविला. २०१३ च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य आणि २०१६ आणि २०१७ च्या राष्टÑकुल चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्ण पदक जिंकले आहे.९७ किलो गटात मौसम खत्रीकडून सुवर्णाची अपेक्षा होती, पण त्याला द. आफ्रिकेचा मार्टिन इरास्मस याच्याकडून धक्का बसला. महिलांच्या ५७ किलो गटात पूजा ढांडा सुवर्ण लढतीत नायजेरियाची ओडुनायो आडेकुरोये हिच्याकडून ५-७ ने पराभूत झाली. दिव्या काकरान महिलांच्या ६० किलो गटात नायजेरियाची दोन वेळेची राष्टÑकुल पदक विजेती ब्लेसिंग ओबोरुडूडू हिच्याकडून पराभूत झाल्यानंतर कांस्य पदकाच्या लढतीत दिव्याने बांगला देशची शेरीन सुल्ताना हिच्यावर ४-० ने मात केली. (वृत्तसंस्था)
नेमबाजी, कुस्तीत सुवर्णांची लयलूट, १५ वर्षांच्या अनिशची ऐतिहासिक कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 2:04 AM