नवी दिल्ली : पांरपरिक प्रतिस्पधीं पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने कोणतेही प्रयोग करणे टाळले पाहिजे, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केले आहे.एका संकेतस्थळावरील कार्यक्रमात बोलताना द्रविड म्हणाला, आतापर्यंत ज्या गोष्टी भारतासाठी फायदेशीर ठरल्या आहेत, केवळ त्याच गोष्टींवर कोहलीने अंमल करावा, त्याने इतर कोणतेही प्रयोग करू नयेत. द्रविड म्हणाला, भारताला नेहमी धावांचा पाठलाग करण्यास आवडते. त्यांच्याकडे संघात असे खेळाडू आहेत, की जे दबावाच्या मोठ्या सामन्यात खेळले आहेत. परिस्थितीशी कसा मुकाबला करावा हे त्यांना चांगले कळते. ही रणनीती भारतासाठी नेहमीच फायद्याची राहिली आहे.भारत पहिल्या पॉवरप्लेमध्ये पाचपेक्षा कमी धावगतीने खेळतो म्हणून काही लोक शंका उपस्थित करीत आहेत. परंतु रोहित शर्मा आणि शिखर धवन हे त्या वेळी मोठ्या धावसंख्येचा पाया रचत असल्याचे दिसून येते. कारण पुढे भारताकडे विराट कोहली, हार्दिक पांड्या, युवराजसिंग, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, रवींद्र जडेजा असे फलंदाज आहेत जे वेगाने धावा करू शकतात. (वृत्तसंस्था)विश्रांतीचा सल्ला : बुमराहबर्मिंघम : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात जसप्रित बुमराहचा समावेश करण्यात आलेला नाही, याबाबत तो म्हणाला की, माझ्या तंदुरुस्तीचा प्रश्न नाही, तर अतिक्रिकेटमुळे माझ्यावर दबाव येऊ नये म्हणून मला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.