नवी दिल्ली : आॅलिम्पिक पदकविजेती मल्ल साक्षी मलिक हिला विनापरवानी राष्टÑीय शिबिर सोडल्यावरून भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. याच आरोपांवरून शिबिरात सहभागी असलेल्या २५ महिला मल्लांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.लखनौ येथील साई केंद्रात सहभागी ४५ महिला मल्लांपैकी २५ जणींनी कुठलेही कारण न देता शिबिराकडे पाठ फिरविली होती. या २५ मल्लांमध्ये साक्षी मलिक (६२ किलो), सीमा बिस्ला (५० किलो), आणि किरण (७६ किलो), यांनी नुकतीच विश्व चॅम्पियनशिपची पात्रता गाठली आहे.या तिघींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून बुधवारपर्यंत उत्तर मागितले आहे. याशिवायअन्य सर्व मल्लांना पुढील आदेशापर्यंत राष्टÑीय शिबिरातून निलंबित करण्यात आले. याशिवाय सोमवारी झालेल्या विश्व चॅम्पियनशिपच्या बिगर आॅलिम्पिक श्रेणी चाचणीत सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला.पूजा, नवज्योत विश्व चॅम्पियनशिपसाठी पात्रआॅलिम्पिक वजन गटात स्थान निश्चित करण्यात अपयशी ठरलेल्या महिला मल्ल पूजा ढांडा व नवज्योत कौर यांनी सोमवारी लखनौमध्ये चाचणीसाठी मॅटवर न उतरताच विश्व चॅम्पियनशिपसाठी तिकीट पक्के केले. आॅलिम्पिक वजनगटासाठी निवड चाचणी यापूर्वीच झालेली आहे आणि सोमवारी बिगर आॅलिम्पिक गटाच्या चाचणीत पूजाने ५९ किलो तर नवज्योतने ६५ किलो वजन गटात आपले स्थान निश्चित केले. दोन्ही खेळाडूंना आव्हान देण्यासाठी प्रतिस्पर्धी महिला मल्ल नव्हती.भारतीय कुस्ती महासंघाने शिस्तभंगाच्या आरोपाखाली २५ मल्लांवर बंदी घातली आहे. त्यातील सात मल्ल या चाचणीत सहभागी होणार होत्या. ५९ व ६५ किलो वजन गटात दावेदारीसाठी अन्य दुसऱ्या मल्ल उपस्थित नव्हत्या. आॅलिम्पिक वजन गटातील चाचणीत ५७ किलो वजन गटात पूजाला सरिता मोरने पराभूत केले होते, पण विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावण्याची तिच्याकडे आणखी एक संधी आहे. तिने गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाचा मान मिळवला होता.आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणारी नवज्योतकडे विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावण्याची संधी आहे. ती ६८ किलो गटात दिव्या काकरानविरुद्ध पराभूत झाली होती. सोमवारी चार गटासाठी चाचणी होणार होती, पण या सर्वांचा निर्णय केवळ दोन गटातील लढतींमध्ये झाला. ललिताने ५५ किलो वजन गटात तिकीट पक्के केले. तिला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. त्यानंतर तिने मिनाक्षीचा ९-१ ने पराभव केला.
साक्षी मलिकला कारणे दाखवा नोटीस, २५ महिला मल्ल निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 6:12 AM