मुंबई : सलामीवीर शुभम गिलच्या (१३८*) शानदार नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताच्या युवा संघाने इंग्लंडला ७ विकेट्सने नमवले. यासह भारताने १९ वर्षांखालील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत२-१ अशी आघाडी घेतली आहे.ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ३ फलंदाजांच्या मोबदल्यात आणि ३५ चेंडू राखून विजय मिळवला. शुभमने सामन्यात निर्णायक कामगिरी करताना १५७ चेंडूत १७ चौकार व २ षटकारांसह नाबाद १३८ धावांची खेळी केली. त्याने फॉर्ममध्ये असलेल्या हिमांशू राणासह (१९) ६३ धावांची सलामी देत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. हिमांशूला या सामन्यात आपली छाप पाडता आली नाही. तसेच, प्रियम गर्ग (८) आणि सलमान खान (११) झटपट परतल्याने भारताचा डाव २१.३ षटकात ३ बाद १०१ धावा असा घसरला.मात्र, एका बाजूने टिकलेल्या शुभमने इंग्लंडच्या गोलंदाजांची पिटाई करताना हार्विक देसाईसह चौथ्या विकेटसाठी नाबाद ११५ धावांची भागीदारी केली. हार्विकने ५० चेंडूत १ चौकार १ षटकार ठोकून नाबाद ३७ धावांसह शुभमलाचा उपयुक्त साथ दिली. इंग्लंडकडून डेलरे रॉलिन्सने पुन्हा एकदा चमक दाखवताना ३० धावांत २ बळी घेतले. तर लियाम पॅटरसन - व्हाइटला एक बळी घेण्यात यश आले.तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव ४९ षटकात २१५ धावांवर संपुष्टात आला. राहुल चहरने अचूक मारा करताना ३३ धावांत ४ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. तसेच अनुकुल रॉयने ३९ धावांत ३ बळी घेत इंग्लंडला जखडवून ठेवले. अडखळती सुरुवात झालेल्या इंग्लंडला जॉर्ज बार्टलेट (५५) आणि डेलरे रॉलिन्स (९६) यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघांना अनुक्रमे चहर आणि रॉयने बाद करुन भारताला पकड मिळवून दिली. रॉलिन्सने १०६ चेंडूत ११ चौकार व २ षटकारांसह आपली खेळी सजवली. तो शतक झळकावण्यापासून चार धावांनी दूर राहिला. (क्रीडा प्रतिनिधी)संक्षिप्त धावफलकइंग्लंड (१९ वर्षांखालील) : ४९ षटकात सर्वबाद २१५ धावा. (डेलरे रॉलिन्स ९६, जॉर्ज बार्टलेट ५५; राहुल चहर ४/३३, अनुकुल रॉय ३/३९) पराभूत वि. भारत (१९ वर्षांखालील) : ४४.१ षटकात ३ बाद २१६ धावा. (शुभम गिल नाबाद १३८, हार्विक देसाई नाबाद ३७;डेलरे रॉलिन्स २/३०).
भारताच्या विजयात शुभम चमकला
By admin | Published: February 04, 2017 12:54 AM