मुंबई : चुरशीच्या सामन्यात साक्षी सूर्यवंशीने मानसी कारेकरचा २-० असा पराभव करत इंदिराबाई फणसे स्मृती बॅडमिंटन मुलींच्या स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात अजिंक्यपदावर नाव कोरले. माजी आंतरराष्ट्रीय महिला बॅडमिंटनपटू अमि शाह यांच्या उपस्थितीत विजेत्यांना चषक देत अभिनंदन करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन सभागृहात स्पर्धेचे सामने खेळवण्यात आले.जी.के. फणसे स्पोटर््स फाउंडेशनने स्पर्धेचे आयोजन केले होते. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने सायना नेहवाल चषक स्पर्धेच्या धर्तीवर ठाण्यामध्ये सलग दुसऱ्यांदा आयोजित केलेल्या स्पर्धेला ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साक्षी विरुद्ध मानसी असा सामना रंगला. साक्षीने पहिल्या सेटमध्ये काही अंशी आक्रमक सुरुवात केली. मानसीने जशास तसा खेळ करत चोख प्रत्युत्तर दिले. सेटदरम्यान कधी साक्षी तर कधी मानसी आघाडीवर होती. साक्षीने केवळ ३ गुणांच्या फरकाने पहिल्या सेटमध्ये २१-१८ अशा विजयाची नोंद केली. पिछाडीवर असणाऱ्या मानसीने दुसऱ्या सेटमध्ये पुन्हा दमदार खेळाने सुरुवात केली. मात्र साक्षीने दुसऱ्या सेटमध्येदेखील २ गुणांनी (२२-२०) अशी बाजी मारत स्पर्धेत अजिंक्यपदाला गवसणी घातली. (क्रीडा प्रतिनिधी)
बॅडमिंटनमध्ये साक्षी सूर्यवंशीला अजिंक्यपद
By admin | Published: June 24, 2016 5:26 AM