Kusti Dangal Solapur | सोलापूर : अलीकडेच पुण्यात बहुचर्चित अशा महाराष्ट्र केसरीची स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव झालेल्या आणि त्यावरून वादात अडकलेल्या पैलवान सिकंदर शेखने सोलापूर येथे पार पडलेल्या स्पर्धेत पंजाबच्या पैलवानाला अस्मान दाखवून कुस्ती आपल्या नावावर केली. खासदार धनंजय महाडिक यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त 1 लाख रूपयांची ही स्पर्धा भरवण्यात आली होती. महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे सिकंदर शेख खूप चर्चेत आला होती. दरम्यान, मोहोळ तालुक्याचा पैलवान सिकंदर शेखने पंजाबच्या भूपेंद्रसिंगविरूद्धचा डाव 2 मिनिटांत संपवून कुस्ती जिंकली.
'महाराष्ट्र केसरी'मधील वादामुळे चर्चेत सिकंदर शेखवर महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अन्याय झाला असल्याचे त्याचे चाहते म्हणत आहेत. यावर खुद्द सिकंदरने स्पष्टीकरण देताना म्हटले होते, "जिथे टांग लागली तिथे परफेक्ट टांग लागली नव्हती, पण त्याची (महेंद्र गायकवाड) ॲक्शन होती म्हणून त्याला 2 गुण द्यायला पाहिजे होते. तसेच माझी पूर्णपणे पकड होती म्हणून मला 1 गुण द्यायला हवा होता. अशी 4-3 ने कुस्ती चालायला हवी होती. तिथे 2 गुण द्यायला हवे होते तिथे 4 गुण देण्यात आले. वरून पूर्णपणे खाली पडल्यावर 4 गुण दिले जातात पण तसे झाले नाही. माझ्या प्रशिक्षकांना दाद मागितली पण त्यांना तिथून हाकलून दिले. मी पूर्णपणे तयारी केली होती त्यामुळे मी महाराष्ट्र केसरी झालो असतो. पण तसे झाले नाही हे सर्व थांबले पाहिजे."
पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणार - सिकंदर शेख तसेच पुढच्या वर्षी कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची गदा आणणार असल्याचेही सिंकदर शेखने म्हटले. "मागील खूप दिवसांपासून आमची तालीम महाराष्ट्र केसरीची वाट पाहत आहे. मी नक्कीच पुढच्या वर्षी कोल्हापूरात महाराष्ट्र केसरीची गदा आणेन", असे सिकंदरने म्हटले होते.