मुंबई : महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेत पै. महेंद्र गायकवाड आणि पै. सिकंदर शेख यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यावेळी मारुती सातव पंच होते. या सामन्यात झालेल्या पराभवामुळे पै. सिकंदर शेख याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्यानंतर पंच मारुती सातव यांना धमकीचे फोन आल्याची चर्चा आहे, मात्र खुद्द सिकंदर शेखने ही धमकी नसून फक्त विचारणा केली असल्याचे म्हटले आहे. तसेच माझ्यावर अन्याय झाला असल्याचे देखील सिकंदर शेखने म्हटले.
दरम्यान, पंचाना दिलेल्या धमकीवरून सिकंदर शेखने स्पष्टीकरण दिले आहे. सिकंदर शेखने म्हटले, "जिथे टांग लागली तिथे परफेक्ट टांग लागली नव्हती, पण त्याची (महेंद्र गायकवाड) ॲक्शन होती म्हणून त्याला 2 गुण द्यायला पाहिजे होते. तसेच माझी पूर्णपणे पकड होती म्हणून मला 1 गुण द्यायला हवा होता. अशी 4-3 ने कुस्ती चालायला हवी होती. तिथे 2 गुण द्यायला हवे होते तिथे 4 गुण देण्यात आले. वरून पूर्णपणे खाली पडल्यावर 4 गुण दिले जातात पण तसे झाले नाही. माझ्या प्रशिक्षकांना दाद मागितली पण त्यांना तिथून हाकलून दिले. मी पूर्णपणे तयारी केली होती त्यामुळे मी महाराष्ट्र केसरी झालो असतो. पण तसे झाले नाही हे सर्व थांबले पाहिजे."
पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणार - सिकंदर शेख तसेच पुढच्या वर्षी कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची गदा आणणार असल्याचेही सिंकदर शेखने म्हटले. "मागील खूप दिवसांपासून आमची तालीम महाराष्ट्र केसरीची वाट पाहत आहे. मी नक्कीच पुढच्या वर्षी कोल्हापूरात महाराष्ट्र केसरीची गदा आणेन. पंच मारूती सातव यांना धमकी नसून फक्त विचारणा केली आहे. तसेच पैलवान संग्राम कांबळेंनी पंचांना फक्त प्रश्न विचारला असे सिकंदरने ABP माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
शिवराज राक्षे 'महाराष्ट्र केसरी'चा मानकरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती गटातील अंतिम लढतीत पुण्याच्या महेंद्र गायकवाडने सोलापूरच्या सिकंदर शेखचा पराभव केला. गादी गटात नांदेडच्या शिवराज राक्षेने नाशिक हर्षवर्धन सदगीरचा पराभव करून केला. दोन्ही गटातील विजेते पैलवान महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत झाली. यामध्ये निकाली कुस्ती करत पैलवान शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाडला चितपट करत 'महाराष्ट्र केसरी' किताब पटकावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दोन्ही खेळाडूंना गदा प्रदान करण्यात आली.
पुण्यातील स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत आयोजित 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत राज्यभरातून पैलवान दाखल झाले होते. परिसरात लावलेले फलक, स्वागत कमानी यामुळे कोथरूडचा परिसर कुस्तीमय झाला होता. प्रमुख लढतींसह एकूण 18 वजनी गटात 950 पैलवान या स्पर्धेत सहभागी झाले होते. मागील आठवड्यात ही स्पर्धा अतिसंशय उत्साहात पार पडली. स्पर्धा 2022-23 च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्र केसरी' विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा प्रदान करण्यात आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"