सांगली : अलीकडेच पुण्यात बहुचर्चित अशा महाराष्ट्र केसरीची स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव झालेल्या आणि त्यावरून वादात अडकलेल्या पैलवान सिकंदर शेखने सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील विसापूर केसरी स्पर्धेत पंजाबच्या पैलवानाला धोबीपछाड देत या स्पर्धेवर नाव कोरले. सिकंदर शेखला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत चुकीच्या निर्णयामुळे पराभव पत्करावा लागला असे त्याच्या समर्थकांचे म्हणणे आहे. अशातच त्याने 'विसापूर केसरी'चा किताब जिंकून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सिकंदर शेखने 'दंगल' जिंकलीदरम्यान, सिकंदर शेखने केवळ पाच मिनिटांत मोळी डावावर पंजाबचा पैलवान नवजीत सिंगला अस्मान दाखवले. महाराष्ट्र केसरीप्रमाणेच विसापूर केसरी ही देखील स्पर्धा प्रसिद्ध आहे. सांगलीतील यल्लमा देवी यात्रेनिमित्त भारतातील नामवंत मल्लांच्या उपस्थितीत विसापूर कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानावर एकूण 150 ते 200 अशा कुस्त्या झाल्या.
खरं तर या स्पर्धेत विजेत्या पैलवानाला पाच लाख रूपयांचे बक्षीस होते. पैलवान सिकंदर शेखने पंजाबचा नवजित सिंगला पराभूत करून सहज विजय मिळवला. लक्षणीय बाब म्हणजे सिकंदरने अवघ्या काही वेळातच मोळी डावावर पंजाबच्या मल्लाला अस्मान दाखवले. सिकंदरच्या या विजयाने राज्यभरातील त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
'महाराष्ट्र केसरी'मधील वादामुळे चर्चेत सिकंदर शेखवर महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अन्याय झाला असल्याचे त्याचे चाहते म्हणत आहेत. यावर खुद्द सिकंदरने स्पष्टीकरण देताना म्हटले होते, "जिथे टांग लागली तिथे परफेक्ट टांग लागली नव्हती, पण त्याची (महेंद्र गायकवाड) ॲक्शन होती म्हणून त्याला 2 गुण द्यायला पाहिजे होते. तसेच माझी पूर्णपणे पकड होती म्हणून मला 1 गुण द्यायला हवा होता. अशी 4-3 ने कुस्ती चालायला हवी होती. तिथे 2 गुण द्यायला हवे होते तिथे 4 गुण देण्यात आले. वरून पूर्णपणे खाली पडल्यावर 4 गुण दिले जातात पण तसे झाले नाही. माझ्या प्रशिक्षकांना दाद मागितली पण त्यांना तिथून हाकलून दिले. मी पूर्णपणे तयारी केली होती त्यामुळे मी महाराष्ट्र केसरी झालो असतो. पण तसे झाले नाही हे सर्व थांबले पाहिजे."
पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणार - सिकंदर शेख तसेच पुढच्या वर्षी कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची गदा आणणार असल्याचेही सिंकदर शेखने म्हटले. "मागील खूप दिवसांपासून आमची तालीम महाराष्ट्र केसरीची वाट पाहत आहे. मी नक्कीच पुढच्या वर्षी कोल्हापूरात महाराष्ट्र केसरीची गदा आणेन", असे सिकंदरने म्हटले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"