फोज डो इगाकू : सिक्की रेड्डी व प्रणव जेरी चोपडा या भारतीय जोडीने कॅनडाच्या तोबी एनजी व राचेल होंडरीच जोडीचा पराभव करून ब्राझील ओपन बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीत जेतेपदाचा मान मिळविला. या जोडीचे हे पहिले ग्रांप्री विजेतेपद आहे. जागतिक क्रमवारीत ६५व्या स्थानावर असलेल्या अव्वल मानांकित भारतीय जोडीने अंतिम फेरीत तोबी व राचेल या दुसऱ्या मानांकित जोडीचा केवळ ३७ मिनिटांमध्ये २१-१५, २१-१६ ने पराभव केला. रविवारी रात्री जेतेपद पटकावल्यानंतर सिक्कीने फेसबुक पेजवर म्हटले, की ‘माझे व प्रणव जेरी चोपडाचे हे पहिले ग्रांप्री विजेतेपद आहे. मी आनंदी आहे. मला स्व:खर्चाने या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी प्रदान करणाऱ्या माझ्या कुटुंबीयांची मी आभारी आहे. याव्यतिरिक्त तान किम हेर, पुल्लेला गोपीचंद, अरुण विष्णू आणि सुमीत रेड्डी यांचेही विशेष आभार! तु्म्ही मला खडतर कामगिरी करण्यास प्रोत्साहित केले. मी कसून मेहनत घेतली; पण त्यासाठी तुम्ही मला प्रेरित केले. तुम्ही सर्वच माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहात.’प्रणव व पुरुष दुहेरीतील त्याचा सहकारी अक्षय देवाळकरने सईद मोदी ग्रांप्री गोल्ड स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये चीनचा ३-२ने पराभव करून कांस्यपदक पटकावणाऱ्या भारतीय संघात त्याचा समावेश होता. (वृत्तसंस्था) >२०१४ व २०१६ मध्ये कांस्यपदक उबेर कप पटकावणाऱ्या भारतीय संघाची सदस्य असलेली सिक्की आतापर्यंत मिश्र दुहेरीमध्ये ६ वेगवेगळ्या जोडीदारांसह खेळली आहे. त्यात दिजू, एल्विन फ्रान्सिस, तरुण कोना, मनू अत्री आणि नंदगोपाल यांचा समावेश आहे. २३ वर्षीय खेळाडूने गेल्या वर्षी ५ आंतरराष्ट्रीय चॅलेंजर किताब पटकावले. त्यात दोन मिश्र दुहेरीच्या, तर तीन महिला दुहेरीच्या जेतेपदांचा समावेश आहे. युगांडा ओपनमध्ये तिने महिला दुहेरी व मिश्र दुहेरीत जेतेपद पटकावले होते.
सिक्की-प्रणव यांना विजेतेपद
By admin | Published: September 06, 2016 1:45 AM