नवी दिल्ली : जलदगती गोलंदाज ईशांत शर्मा आणि अष्टपैलू युवराजसिंग यांना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या नवव्या सत्रासाठी ‘मार्की’ खेळाडूचा दर्जा देण्यात आला असून आज, शनिवारी यासाठी बंगलोर येथे एक दिवसाची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. लिलावात ३५१ खेळाडूंवर बोली लागणार असून, यात २३0 भारतीय, तर १२१ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.आयपीएलसाठी उपलब्ध असलेल्या ७१४ खेळाडूंपैकी ३५१ खेळाडूंना निवडण्यात आले आहे. इशांत आणि युवराज यांच्याशिवाय आॅस्ट्रेलियाचा शेन वॉटसन आणि अॅरोन फिंच, इंंग्लंडचा केव्हिन पीटरसन, दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन, न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टील आणि वेस्ट इंडीजचा डवेन स्मिथ यांना या लिलावासाठी मार्की खेळाडंूचा दर्जा देण्यात आला आहे. इशांत आणि युवराजसह १२ खेळाडूंची बेस प्राईस दोन कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.‘आयपीएल’चे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सांगितले की, आयपीएल २0१६ साठी खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेपासून जगातील सर्वांत लोकप्रिय क्रिकेट स्पर्धेच्या नवव्या सत्राला प्रारंभ होणार आहे. सर्व फ्रँचाईजी गेल्या काही महिन्यांपासून याची तयारी करीत असून, आता त्यांच्याजवळ क्रिकेट जगतातील काही मोठ्या नावांना निवडण्याची समान संधी असणार आहे. यंदाचा लिलाव ‘आयपीएल’चे दोन नवीन संघ राजकोट आणि पुण्यासाठी हा पहिला लिलाव असणार आहे. ‘आयपीएल’चा सर्वांत महागडा खेळाडू ठरलेल्या युवराजसिंगसह केव्हिन पीटरसन, शेन वॉटसन, मिशेल मार्श आणि ईशांत शर्मा यांच्यासह १२ खेळाडूंची बेस प्राईस दोन कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन, मोहित शर्मा, जोस बटलर यांना दीड कोटी बेस प्राईस ठेवण्यात आली आहे. इरफान पठाण, टीम साउदी यांना एक कोटी, तर मार्टिन गुप्टील, जैसन होल्डर, बरिंंदर सरण यांची ५0 लाख रुपये बेस प्राईस ठेवण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)या लिलावात सर्वांत जास्त आकर्षण असणार आहे ते युवराजसिंगचे. तो ‘आयपीएल’चा जुना आणि अनुभवी खेळाडू आहे. २0१४ च्या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने त्याला १४ कोटी रुपये इतकी विक्रमी किंमत मोजली होती. त्याच्यापुढे जाऊन दिल्ली डेअर डेव्हिल्स्ने गेल्यावर्षी म्हणजे २0१५मध्ये त्याला तब्बल १६ कोटी रुपये मोजले. इतकी किंमत मोजूनही दोन्ही संघांनी त्याला वर्षातच रिलीज केले. आता तो मार्की प्लेअर म्हणून नवव्या सत्राच्या लिलावात गणला जाणार असल्याने त्याला किती रक्कम मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. युवराजसिंग ‘आयपीएल’मध्ये आतापर्यंत चार संघाकडून खेळला आहे.
‘सिक्सर किंग’ युवराजसिंग मोस्ट अट्रॅक्शन
By admin | Published: February 06, 2016 3:21 AM