सिंगापूर : महाराष्ट्राच्या विक्रम कुऱ्हाडेने राष्ट्रकुल कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ग्रीको रोमन प्रकारात ५९ किलो गटात रौप्यपदक जिंकले. रविवारी भारतीय मल्लांनी वर्चस्व कायम राखत तब्बल ८ पदके जिंकली. आत्तापर्यंत या स्पर्धेत भारताने दोन दिवसांत तब्बल २२ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. विक्रम कुऱ्हाडेने उपांत्यफेरीत पाकिस्तान मल्लाचा ८-० गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या वजनगटात भारताच्या रविंदर बिल्लाकडून विक्रमला ७-२ गुणांनी पराभव पत्करावा लागला. ग्रीको रोमन प्रकारात भारतीय मल्लांनी तीन सुवर्ण, फ्री स्टाइल प्रकारात पाच सुवर्णपदक जिंकत फ्री स्टाइल प्रकारातील पाचही वजनगटातील सर्वच्या सर्व सुवर्णपदके खिशात घातली. ६१ किलोग्रॅम गटात हर्फुलने सुवर्ण तर विकासने रौप्य, ६५ किलोग्रॅम गटात बजरंगने सुवर्ण तर राहुल मान याने रौप्य, ७४ किलोग्रॅम गटात जितेंद्रने सुवर्ण तर संदीप काटेने रौप्य, ८६ किलोग्रॅम गटात दीपकने सुवर्ण तर अरुणने रौप्य तसेच १२५ किलोग्रॅम गटात हतेंन्दरने सुवर्ण तर कृष्णने रौप्यपदक पटकावले. ७१ किलोग्रॅम गटात दीपकाने सुवर्ण आणि रफीकने रौप्य, ९८ किलोग्रॅम गटात हरदीपने सुवर्ण तर सचिनने रौप्यपदक पटकावले. भारताने पहिल्या दिवशी १४ आणि दुसऱ्या दिवशी आठ सुवर्णपदक जिंकत स्पर्धेवर चांगलेच वर्चस्व मिळवले आहे. (वृत्तसंस्था)पुणे : विक्रम कुऱ्हाडे, उत्कर्ष काळे यांच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीबाबत समाधानी आहे. त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा होतीच, असे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे मार्गदर्शक, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या दोघांबरोबरच किरण भगत आणि राहुल आवारे या चौघांची २०२० टोकिया आॅलिम्पिकची तयार सुरू आहे. या पदकांमुळे विक्रम आणि उत्कर्षचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. त्याची आत्ताची तयारी पाहता आगामी राष्ट्रकुल क्रीडा, वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई क्रीडा स्पर्धा या सर्व स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे असे ते शेवटी म्हणाले.
महाराष्ट्राच्या विक्रम कुऱ्हाडेला रौप्य
By admin | Published: November 07, 2016 12:03 AM