रिओ : भारताच्या दीपा मलिकने ऐतिहासिक कामगिरी करताना रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत गोळाफेक एफ-५३ प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू असा इतिहास दीपाने या वेळी रचला. दीपाने चमकदार कामगिरी करताना आपल्या सहा संधींमध्ये ४.६१ मीटरची सर्वोत्तम फेक करून रौप्यपदकावर आपले नाव कोरले. या पदकासह यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात एकूण ३ पदकांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे दीपाच्या या घवघवीत यशानंतर हरियाणा सरकारच्या योजनेनुसार दीपाला तब्बल ४ कोटी रुपयांचा आर्थिक पुरस्कार मिळेल. दरम्यान, बहारीनच्या फातिमा नदीमने ४.७६ मीटरची सर्वोत्कृष्ट फेक करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. तर, यूनानच्या दिमित्रा कोरोकिडाला ४.२८ मीटरच्या फेकीसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दीपाच्या कमरेखालील भाग अर्धांगवायूग्रस्त आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे ती एका सेनाधिकाऱ्याची पत्नी असून दोन मुलांची आई आहे. पाठीच्या कण्यातील ट्यूमरमुळे १७ वर्षांपूर्वी दीपाचे चालणे फिरणे बंद झाले होते. यामुळे दीपावर तब्बल ३१ वेळा शस्त्रक्रिया झाली असून, तिच्या कंबर व पायाच्या मधील भागावर सुमारे १८३ टाके लावण्यात आले.दीपाने गोळाफेक व्यतिरिक्त भालाफेक आणि स्विमिंग स्पर्धेतही सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्विमिंग स्पर्धेत पदक जिंकण्यात दीपा यशस्वी ठरली आहे. तर, भालाफेकमध्ये तिच्या नावावर आशियाई विक्रम असून, थाळीफेकमध्ये आणि गोळाफेकमध्ये २०११ साली दीपाने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पटकावले आहे. (वृत्तसंस्था)क्रीडामंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा...क्रीडामंत्री विजय गोयल यांनी रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्य पटकावणाऱ्या दीपा मलिकचे अभिनंदन केले आहे. पॅरालिम्पिकमध्ये मिळत असलेल्या सलग यशामुळे देशाचे नाव उंचावत आहे, अशा शब्दांत गोयल यांनी दीपाला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर, पॅरालिम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वैयक्तिकरीत्या विनंती करणार असल्याचेही गोयल यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे, याआधीच केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य विजेत्या खेळाडूंना अनुक्रमे ७५ लाख, ५० लाख आणि ३० लाख रुपयांचे रोख बक्षिस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
दीपा मलिकने जिंकले रौप्यपदक
By admin | Published: September 13, 2016 3:33 AM