- ऑनलाइन लोकमत
वारसॉ, दि. 26 - ऑलिम्पिकमध्ये एक पदक मिळावं यासाठी खेळाडू वर्षानुवर्षे सराव करत असतात. पदक न मिळवता मायदेशी परतावं लागल्यास दुख: आणि टीका एकत्र झेलावं लागतं. मिळवलेलं पदक पुढील अनेक वर्ष आपल्या यशाची आठवण करुन देत असतं, त्यामुळे त्याला जीवापड जपणारे खेळाडू दिसतात. मात्र पिओत्र मालाचोव्हस्की याला अपवाद असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रिओ ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या थाळीफेकीत 'सिल्व्हर मेडल' मिळवणा-या पिओत्र मालाचोव्हस्कीने कॅन्सर पीडित मुलाच्या उपचारासाठी आपलं मेडलं विकलं आहे. विशेष म्हणजे पिओत्र मालाचोव्हस्की या मुलाला ओळखतही नाही. फेसबुकवरुन त्याच्या आईने मदत मागितल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला.
ओलेक नाव असलेल्या कॅन्सर पीडित मुलाच्या उपचारासाठी पैसे जमा व्हावेत यासाठी पिओत्र मालाचोव्हस्कीने आपल्या मेडलचा लिलाव केला आहे. त्याने स्वत: फेसबूकवरुन ही माहिती दिली आहे. 'एका महिलेकडून मला पत्र आलं होतं. त्यांच्या तीन वर्षाच्या मुलाला डोळ्याचा कॅन्सर झाला आहे, न्यूयॉर्कमध्ये जाऊन उपचार करणं हीच शेवटची आशा असल्याचं त्यांनी पत्रात लिहिलं होतं', अशी माहिती पोस्ट पिओत्र मालाचोव्हस्कीने दिली आहे. त्यानंतर पिओत्र मालाचोव्हस्कीने आपलं मेडल विकून त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला
'मी रिओमध्ये गोल्ड मेडल जिंकण्यासाठी लढलो. आज मी प्रत्येकाला त्याहीपेक्षा मौल्यवान गोष्टीसाठी लढण्याचं आवाहन करतो. जर तुम्ही मला मदत केलीत तर माझं सिल्व्हर मेडल गोल्डपेक्षाही मौल्यवान होईल', असं पिओत्र मालाचोव्हस्कीने लिहिलं आहे.