दिनेश गुंड, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंचभूगाव : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कटकेने सातारच्या किरण भगतचा १०-७ गुणांनी पराभव करून चांदीची गदा आपल्या खांद्यावर घेतली.समस्त ग्रामस्थ भूगाव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आयोजित ६१ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भूगाव येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीतझालेल्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी आजपर्यंतच्या इतिहासात एवढी रंगतदार लढत प्रेक्षकांना पाहण्यास मिळाली नव्हती. इतकी रंगतदार लढत आज भूगाव मुक्कामी प्रेक्षकांच्या डोळ््यांचे पारणे फिटणारी झाली.सकाळपासूनच कुस्तीशौकिनांच्या चर्चेत एकच विषय होता. अभिजित की किरण गदेचा मानकरी? बरोबर साडेसहा वाजता दोघेही मैदानात वॉर्मिंगअप करत आले आणि उपस्थित प्रेक्षकांनी अक्षरश: मैदान डोक्यावर घेतले. पाय ठेवायलासुद्धा जागा शिल्लक नव्हती, एवढा प्रचंड जनसमुदाय या अटीतटीच्या लढतीला डोळ््यात साठविण्यासाठी उत्सुक होता. कुस्तीच्या सुरुवातीपासूनच दोघेही आक्रमक होते. अभिजितने आपल्या उंचीचा व ताकदीचा फायदा घेत किरणवर ताबा मिळवित ३-१ ने आघाडी घेतली होती. परंतु चपळ चित्त्यासारखा लढणारा किरणही काही कमी नाही हे त्याने अभिजितला दाखवून देत गुणांची पिछाडी भरून काढली आणि पाहता पाहता गुणांची कमाई करून पीछेहाट भरून काढली. किरणच्या मार्गदर्शकाने केलेले पंचांच्या निर्णयाचे अपील ज्युरींनी रिप्ले पाहून अभिजितला ताकीद गुण, तर किरणला २ गुण देण्यात आले आणि गुणफलक ३-७ वर पोहोचला. तोपर्यंत कुस्तीची ५ मिनिटे २० सेकंद वेळ संपली होती. परंतु लढवय्या दिलाचा अभिजित खºया अर्थाने प्रेक्षकांना पाहायला मिळाला तो शेवटच्या ४० सेकंदांत! अभिजितने एकापाठोपाठ एक गुणांची कमाई करत गुणफलक ८-७ वर नेऊन ठेवला आणि प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके अधिकच वाढले गेले. अखेरचे २० सेकंद करू की मरू स्थिती, वर्षभराच्या तपश्चर्येचे फळ वाया जाऊ द्यायचे नव्हते, म्हणून किरणने आपले कुंडी डावाचे ब्रम्हास्त्र अभिजितवर टाकले. सर्वांचे श्वास रोखले गेले. परंतु आपल्या उंच्यापुºया देहयष्टीचा फायदा घेत अभिजितने अत्यंत चाणाक्षपणे स्वत:चा बचाव करत ताबा मिळवून २ गुणांची वसुली करत उत्कंठावर्धक लढतीत १०-७ ने विजय मिळवित उपस्थित कुस्तीशौकिनांच्या साक्षीने ४२ वा महाराष्ट्र केसरी किताब आपल्या भक्कम बाहूंवर विसावला. मी कालच नमूद केल्याप्रमाणे शिगेला पोहोचलेली उत्सुकता अभिजितच्या आक्रमक खेळीने त्याला गदाधारी बनून थांबविली.
अभिजित कटकेच्या खांद्यावर चांदीची गदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 3:05 AM