ऑनलाइन लोकमतअदीस अबाबा, दि. 24 : रिओ आॅलिम्पिकदरम्यान स्वत:च्या देशातील राजकीय व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आॅलिम्पिक रौप्य विजेता धावपटू फियेसा लिलेसा शिक्षेच्या भीतीपोटी मायदेशात- इथिओपियात पोहोचलाच नाही.लिलेसाला इथिओपियाकडून कुठलीही शिक्षा दिली जाणार नाही, असे आश्वासन मात्र मिळाले होते. तरीही तो इथिओपियाच्या पथकासोबत रिओमधून रवाना झालेल्या विमानात बसला नाही.
लिलेसाने इथिओपियातील राजकीय मुस्कटदाबीचा रिओ आॅलिम्पिकदरम्यान विरोध केला होता. इथिओपियाचे पथक सोमवारी मायदेशा परतले. यादरम्यान लिलेसा पथकात नव्हता. त्याने मॅरेथॉनचे रौप्य जिंकले होते. इथिओपियाने आॅलिम्पिकची आठ पदके जिंकली आहेत. इथिओपियाच्या क्रीड अधिकाऱ्यांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले. पण त्यात लिलेसाचे नावचनव्हते. आता तो देशात परतला तर मात्र त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आॅलिम्पिकच्या अखेरच्या दिवशी पुरुष मॅरेथॉनमध्ये लिलेसाने फिनिश लाईन ओलांडतेवेळी स्वत:चे दोन्ही हात बांधून इथिओपियातील राजकीय दडपशाहीकडे जगाचे लक्ष वेधले होते. केनियाचा एलिवुड किपचोगे याच्या पाठोपाठ लिलेसा दुसऱ्या स्थानावर राहिला होता. नंतर पत्रकारांशी बोलाताना त्याने मायदेशी परतण्याची भीती वाटते, असे सांगितले होते.
२६ वर्षांच्या लिलेसाला या वर्तनासाठी शिक्षा होऊ शकते असे संकेत आहेत. लिलेसाने अमेरिकेत राजकीय आश्रय मागितल्याचे वृत्त आहे. दरम्यान त्याच्या एजंटने लिलेसा जीवाच्या भीतीपोटी इथिओपियात परतणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.