ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पीव्ही सिंधूने सायना नेहवालवर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. सिंधूने 16-21 आणि 20-22 असा सरळ दोन सेटमध्ये सायनावर विजय मिळवून उपांत्यफेरीत प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटनमध्ये भारताला प्रतिष्ठा मिळवून देणा-या भारताच्या या दोन्ही अव्वल बॅडमिंटनपटू इंडियन ओपनच्या निमित्ताने परस्परांसमोर उभ्या ठाकल्या होत्या.
प्रेक्षकांनाही या लढतीची प्रचंड उत्सुक्ता होती. पहिल्या सेटमध्ये सायना निष्प्रभ ठरली. पण दुस-या सेटमध्ये खेळ उंचावत तिने चांगला प्रतिकार केला. दुसरा सेट सायना जिंकेल असे वाटत असतानाच शेवटच्या क्षणी तिने काही चुका केल्या. ज्याचा फायदा उचलत सिंधूने तिच्यावर दोन गुणांच्या फरकाने मात केली.
सायनाचे माजी प्रशिक्षक गोपीचंदही यावेळी कोर्टवर उपस्थित होते. ते आता सिंधूचे प्रशिक्षक आहेत. सायनाने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर, सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. सायनाने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगचा २१-१४, २१-१२ धुव्वा उडवून तर सिंधूने जपानच्या साएना कावाकामीचे कडवे आव्हान २१-१६, २३-२१ परतवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.