नवी दिल्ली : जागतिक विजेती पी. व्ही. सिंधू, बी. साई प्रणीत आणि एन. सिक्की रेड्डी यांनी चार महिन्यांनी बॅडमिंटन कोर्टवर उतरताना कडक सुरक्षा नियमांनुसार सराव सुरू केला. चार महिने कोरोनामुळे कोर्टपासून दूर राहावे लागल्यानंतर या खेळाडूंनी हैदराबाद येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) पुलेल्ला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये सरावाला सुरुवात केली.
तेलंगणा सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर ‘साइ’ने आॅलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या संभाव्य आठ बॅडमिंटनपटूंचे सराव शिबिर सुरू करण्याचा निर्णय घेतला. याबाबत राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांनी सांगितले की, ‘कोरोनामुळे मिळालेल्या दीर्घ विश्रांतीनंतर आपल्या सर्व आघाडीच्या खेळाडूंना पुन्हा एकदा कोर्टवर पाहून आनंद झाला. सुरक्षित वातावरणात प्रशिक्षणाला पुन्हा एकदा सुरुवात करण्यास आम्ही सज्ज आहोत.’ शुक्रवारी सराव सुरू करणाऱ्यांमध्ये सिंधू आघाडीवर होती. तिने गोपीचंद आणि विदेशी प्रशिक्षक पार्क तेइ-सांग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला.सिंधूचे वडील पी. व्ही. रमन्ना म्हणाले की, ‘सिंधूने शुक्रवारी सकाळी ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत सराव केला. या आठवड्यात दररोज ती याच वेळेदरम्यान सराव करेल. संध्याकाळी ती शारीरिक व्यायाम करून तंदुरुस्तीवर भर देईल. घरीदेखील तिचा सराव सुरूच असल्याने मानसिकरीत्या ती सकारात्मक आहे.’थकवाही आला!सिंधूनंतर प्रणीत व सिक्की यांनी ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत सराव केला. प्रणीत म्हणाला, ‘दीर्घ कालावधीनंतर अखेर सरावाच्या निमित्ताने कोर्टवर उतरण्याची संधी मिळाल्याने खूश आहे. सरावादरम्यान सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले.’ तसेच, दीर्घकाळानंतर कोर्टवर उतरल्याने थोडा थकवा आल्याची प्रतिक्रिया सिक्कीने दिली.