ओडेन्से : विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोनदा कांस्यपदकाचा मान मिळविणाऱ्या पी. व्ही. सिंधूने शुक्रवारी चिनी-तैपेईच्या ताई ज्यू यिंगचा पराभप करून डेन्मार्क ओपन सुपर सिरीज प्रिमीअर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. यापूर्वी यिंगविरुद्ध तीनदा पराभव स्वीकारणाऱ्या सिंधूने आज सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले आणि महिला एकेरीत तिसऱ्या मानांकित खेळाडूचा २१-१२, २१-१५ ने पराभव केला. ही लढत केवळ ३४ मिनिटे रंगली. सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित चीनची बॅडमिंटनपटू वांग यिहानच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. यिहानने २०११मध्ये विश्वविजेतेपदाचा मान मिळविला होता आणि लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावले होते. ती विश्वक्रमवारीत काही काळ अव्वल स्थानावर होती. सिंधूला यापूर्वी यिहानविरुद्ध चार वेळा पराभव स्वीकारावा लागला आहे. सिंधूने केवळ २०१३च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये यिहानचा पराभव केला होता. यिंगविरुद्धच्या लढतीत सिंधूने सुरुवातीलाच ४-२ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर सिंधूने आघाडी कायम राखून पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये यिंगने ४-२ अशी आघाडी घेत सुरुवात केली; पण सिंधूने ८-८ अशी बरोबरी साधल्यानंतर लवकरच १४-९ अशी आघाडी घेतली. दरम्यान, यिंगने १३-१४ असा स्कोअर करून चुरस कायम राखण्याचा प्रयत्न केला; पण सिंधूने त्यानंतर कुठलीही संधी न देता विजयावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)
सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
By admin | Published: October 17, 2015 12:00 AM