नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिक रौप्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू व लंडन आॅलिम्पिक कांस्यपदकविजेती सायना नेहवाल यांचा १४ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत व्हिएतनाममध्ये होणाऱ्या पहिल्या आशियाई मिश्र टीम चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
सिंधूने गेल्या आठवड्यात लखनौमध्ये सय्यद मोदी ग्रांप्री स्पर्धेत जेतेपद पटकावले होते, तर सायनाने मलेशिया मास्टर्स स्पर्धेत अजिंक्यपद पटकावत यंदाच्या मोसमाची शानदार सुरुवात केली. तन्वी लाड व रितुपर्ण दास यांना संधी मिळण्याची शक्यता नाही, कारण या स्पर्धेत महिला एकेरीची एक लढत, पुरुष एकेरीची एक लढत, एक महिला दुहेरी आणि एक मिश्र दुहेरीची लढत होणार आहे.
सय्यद मोदी ग्रांप्री गोल्डविजेता समीर वर्माने गेल्या वर्षी हाँगकाँग सुपर सीरिजमध्ये अंतिम फेरी गाठली होती. स्विस ओपन चॅम्पियन एच. एस. प्रणयच्या कामगिरीवरही नजर राहील, तर किदाम्बी श्रीकांतने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला ‘ड’ गटात कोरिया आणि सिंगापूर यांच्यासह स्थान देण्यात आले आहे, तर चीन, चिनी ताइपे व हाँगकाँग यांचा ‘अ’ गटात समावेश आहे. मलेशिया, इंडोनेशिया व श्रीलंका ‘ब’ गटात असून ‘क’ गटात जपान, थायलंड, व्हिएतनाम व फिलिपिन्स हे संघ आहेत.