वुहान (चीन) : रिओ आॅलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदकविजेत्या भारताची अव्वल खेळाडू पी. व्ही. सिंधूने इंडोनेशियाच्या दिनार दियाह आयुस्टाईनला सहज पराभूत करून आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे भारताच्या सायना नेहवालला मात्र पहिल्याच फेरीत जपानच्या सयाको सातोकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे तिचे आव्हान संपुष्टात आले. विश्वमानांकनात तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधूने महिला एकेरीत दिनार दियाह आयुस्टाईनला २१-८, २१-८ गेमनी ३१ मिनिटांत पराभूत केले. दुसरीकडे लंडन आॅलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदकविजेती सायनाला जपानच्या सयाको सातो हिच्याकडून १९-२१, २१-१६, २१-१८ ने पराभव स्वीकारावा लागला. एक तासाहून अधिक काळ हा सामना चालला. सातव्या मानांकित सायनाने या स्पर्धेत दोनदा कांस्यपदक जिंकले होते.पुरुष एकेरीत अजय जयरामने चीनच्या पाचव्या मानांकित तियानला २१-१८, १८-२१, २१-१९ असे पराभूत करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोपडा आणि सिक्की एऩ रेड्डी या जोडीस पहिल्या फेरीत सिवेई झेंग आणि क्विंगचेन चेन या जोडीने केवळ ५० मिनिटांत १५-२१, २१-१४, १६-२१ असे पराभूत केले. पुरुष एकेरीत २०१५ चा स्वीस ओपनचा विजेता एच. एस. प्रणयला आठव्या मानांकित हाँगकाँगच्या एनजी का लोंग एंगस याच्याविरुद्ध १६-२१, २१-१३, १९-२१ असे पराभूत व्हावे लागले. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सिक्की एऩ रेड्डी या जोडीला चेई यू जुंग आणि किम सो इओंग या कोरियाच्या जोडीकडून २०-२२, १६-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. पुरुष दुहेरीत मुन अत्री आणि बी. सुमित रेड्डी यांना कु हाईफेंक आणि झांग नान या जोडीने ९-२१, १८-२१ असे पराभूत केले. (वृत्तसंस्था)
सिंधू पुढच्या फेरीत; सायनाचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: April 27, 2017 12:50 AM