पिनांग : जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावरील भारतीय महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि नवव्या स्थानावरील पुरुष खेळाडू किदाम्बी श्रीकांत यांनी आगेकूच कायम राखताना शुक्रवारी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. अजय जयराम याला मात्र पराभव स्वीकारावा लागला. सिंधूने इंडोनेशियन खेळाडू लिंडावेनी फेनेत्रीचा केवळ २९ मिनिटांमध्ये २१-१०, २१-१० ने एकतर्फी पराभव केला. सिंधूने जागतिक क्रमवारीत २५ व्या स्थानावर असलेल्या फेनेत्रीविरुद्ध १० पैकी ८ सामन्यांत विजय मिळवला आहे. दुसऱ्या मानांकित श्रीकांतने चीनच्या हुआंग युजियांगचा ३३ मिनिटांमध्ये २१-१५, २१-१४ ने पराभव केला. श्रीकांतने जागतिक क्रमवारीत ७६ व्या स्थानावर असलेल्या चीनच्या खेळाडूविरुद्ध कारकीर्दीत प्रथमच सामना खेळला. श्रीकांतला उपांत्य फेरीत यजमान मलेशियाच्या इस्कंदर जुल्कारनैन जैनुदीनच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. जैनुदीनने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आठव्या मानांकित हाँगकाँगच्या लोंग एंगुसचा २१-११, २१-१५ ने पराभव केला. १० व्या मानांकित जयरामला उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित मलेशियाच्या चोंग वेईविरुद्ध २१-१६, २१-१६ ने पराभव स्वीकारावा लागला.
सिंधू, श्रीकांतचा उपांत्य फेरीत प्रवेश
By admin | Published: January 23, 2016 3:51 AM