दुबई : ऑलिम्पिक पदक विजेती अनुभवी पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी सहज विजयासह बुधवारी आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. सिंधूने चायनीज तायपेईची वेन ची सू हिच्यावर २१-१५, २१-२० ने मात केली. विश्व स्पर्धेचा रौप्य विजेता श्रीकांतने अदनान इब्राहिमचा २१-१३, २१-८ ने पराभव केला. त्रिसा जाॅली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या त्रिसा आणि गायत्री जोडीने इंडोनेशियाच्या लैनी त्रिया मायासारी आणि रिबका सुगिआर्ता जोडीला १७-२१, २१-१७, २१-१८ असे पराभूत केले. पहिला गेम गमावल्यानंतर दोघांनी जोरदार पुनरागमन करत दुसऱ्या गेममध्ये ५-० अशी आघाडी घेतली. हा गेम जिंकून त्यांनी सामना निर्णायक गेमपर्यंत नेला. तिसऱ्या गेममध्ये सामना बरोबरीचा होता. एकवेळ त्रिसा - गायत्री जोडी पिछाडीवर होती. त्यानंतर त्यांनी शानदार कामगिरी करत विजय खेचून आणला.मालविका बन्सोड हिने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुची हिला कडवे आव्हान दिले. मात्र २५-२३, २१-१९ अशा गुणफरकाने पराभवाचा सामना करावा लागला.