बाली : पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत या भारताच्या स्टार बॅडमिंटनपटूंनी आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर इंडोनेशियन मास्टर्स सुपर ७५० स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सिंधूने महिला एकेरीत तुर्कीच्या बिगरमानांकित नेसलिहान यिजिटचा दोन गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत श्रीकांतने भारताच्याच एच. एस. प्रणॉयचा सरळ दोन गेममध्ये पराभव केला.
सिंधूने आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना यिजिटला एकही संधी न देता २१-१३, २१-१० असे सहजपणे नमवले. यासह सिंधूने यिजिटविरुद्ध सलग चौथा विजय नोंदवला. आतापर्यंत यिजिटला सिंधूविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही. गेल्यावर्षी डेन्मार्क ओपनमध्येही सिंधूने यिजिटला नमवले होते. स्पर्धेत मिळालेल्या सोप्या ड्रॉचा फायदा घेत उपांत्य फेरी गाठलेल्या सिंधूला आता तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. जपानची अकाने यामागुची आणि थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंग या बलाढ्य खेळाडूंमधील विजेत्याविरुद्ध सिंधू उपांत्य फेरीत लढेल.
पुरुषांमध्ये श्रीकांतला विजय मिळवण्यास फार कष्ट करावे लागले नाहीत. भारताच्याच प्रणॉयविरुद्ध खेळताना श्रीकांतने २१-७, २१-१८ अशी बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये प्रणॉयने पुनरागमनाचे चांगले प्रयत्न केले. मात्र, श्रीकांतने सामन्यावरील पकड सोडली नाही. उपांत्य फेरीत श्रीकांत थायलंडचा कनुलावुट विदितसर्ण आणि डेन्मार्कचा अँडर्स अँटोनसेन यांच्यातील विजेत्याविरुद्ध खेळेल.