उमेश जाधव - पुणे: सन २०१६ मधील रिओ आणि यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकून इतिहास घडवणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. सिंधू मात्र त्यात मश्गुल झालेली नाही. तिची नजर आता तिसऱ्या म्हणजेच सन २०२४ मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकवर आहे. या ऑलिम्पिकमध्ये पदकांची ‘हॅट्ट्रिक’ साधण्यासाठी ती दररोज आठ तास मेहनत करत आहे.
बुधवारी पुण्यात आलेल्या सिंधूनेच याची माहिती दिली. ती म्हणाली की, दररोज सकाळी तीन तास बॅडमिंटनचा सराव चालू आहे. तंदुरुस्ती टिकवण्यासाठी रोज संध्याकाळी व्यायामशाळेत तीन तास घाम गाळते. याशिवाय रोज दोन तास धावणे आणि ‘वेट ट्रेनिंग’ही करते. मानसिक स्वास्थ्य मजबूत ठेवण्यासाठी योग, ध्यानधारणा यावरही तिचा भर आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तिने आता घरातच ‘जिम’ तयार केली आहे. दरम्यान, ज्युनिअर स्पर्धा खेळण्यासाठ अनेकदा पुण्यात येऊन गेल्याची आठवणही सिंधूने या वेळी सांगितली. ‘अनेक वर्षांचा नियमित सराव आणि कठोर मेहनतीमुळेच सलग दुसरे ऑलिम्पिक पदक मिळवणे शक्य झाले. सध्या पदक जिंकल्याचा आनंद साजरा करतेय. तसेच आगामी डेन्मार्क आणि फ्रान्स येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीही कसून तयारी चालू केली आहे,’ असे सिंधूने स्पष्ट केले.
एका रात्रीत यश?‘सगळे एका रात्रीत ‘स्टार’ बनू शकत नाहीत. कधी लवकर यश मिळते कधी थांबावे लागते. या गोष्टी आईवडिलांनी समजून घेण्याची गरज आहे. एका पदकामागे काही महिने किंवा एखाद्या वर्षांची मेहनत नसते तर त्यासाठी अनेक वर्षे कठोर परिश्रम करावे लागतात. पालकांनी मुलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मुलांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी पालकांनाही योगदान द्यावे लागते.’ -पी. व्ही. सिंधू
‘उपांत्य’ पराभव अजून सलतोय‘उपांत्य सामन्यातील पराभवाने मी खूप दु:खी झाले. त्यानंतर ऑलिम्पिक कांस्यपदकाच्या लढतीसाठी आईवडील, प्रशिक्षक यांनी मला प्रोत्साहन दिले. उपांत्य लढतीतला पराभव हा इतिहास झाला आहे. आता हा सामना जिंकायचाच,’ असे प्रशिक्षकांनी सांगितले. त्यानंतर या लढतीत स्वत:ला झोकून दिल्याची आठवण तिने सांगितली.