पेनांग : भारतीय स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कामगिरीत सातत्य राखताना रविवारी स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमरचा सरळ गेम्समध्ये पराभव केला आणि मलेशिया मास्टर्स ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. सुपर सिंधूने यंदाच्या मोसमाची शानदार सुरुवात केली. विश्वचॅम्पियनशिपमध्ये दोनदा कांस्यपदकाचा मान मिळवणाऱ्या तिसऱ्या मानांकित भारतीय खेळाडूने अंतिम लढतीत सुरुवातीपासून वर्चस्व गाजवताना २१-१५, २१-९ ने सरशी साधली. सिंधूने कारकिर्दीत पाचव्यांदा ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत जेतेपद पटकावण्याची कामगिरी केली. सिंधूला यापूर्वी गिलमरविरुद्ध २०१३ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत पराभव स्वीकारावा लागला होता, पण आज सिंधूने त्याची परतफेड केली. सिंधूने मलेशिया मास्टर्स ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले. यापूर्वी २०१३ मध्ये सिंधूने येथे विजेतेपद पटकावले होते. तिने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मकाऊ ओपन ग्रांप्री गोल्डमध्ये जेतेपदाची हॅट््ट्रिक पूर्ण केली होती. या स्पर्धेपूर्वी प्रीमिअर बॅडमिंटन लीग (पीबीएल) स्पर्धेत सिंधूची कामगिरी उल्लेखनीय होती. सिंधूने गिलमरविरुद्ध सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. सिंधूने आज चुका कमी केल्या. पहिल्या गेममध्ये सिंधूने सुरुवातीला ५-२ अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर वर्चस्व कायम राखत आघाडी वाढवली. एक वेळ सिंधूने १२-६ अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर ती १८-१० अशी केली. दुसऱ्या बाजूचा विचार करता स्कॉटलंडच्या खेळाडूने सलग चार गुण वसूल केले, पण सिंधूपुढे आव्हान निर्माण करण्यात ती अखेर अपयशीच ठरली. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने ५-२ अशी सुरुवात केली, पण गिलमरने लवकरच बरोबरी साधली. सिंधूने त्यानंतर चमकदार खेळ करीत सुरुवातीला ९-५ आणि त्यानंतर १६-५ अशी आघाडी मिळवली. गिलमरने त्यानंतर काही गुण वसूल केले, पण ते केवळ पराभवातील अंतर कमी करणारे ठरले. (वृत्तसंस्था)मोसमाची सुरुवात विजेतेपदासह करता आल्यामुळे आनंद झाला. माझी कामगिरी उल्लेखनीय ठरत असून अंतिम लढतीपूर्वीच जेतेपद पटकावण्याबाबत विश्वास होता. उपांत्य फेरीची लढत कडवी होती. त्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळाली. अंतिम लढत सोपी असेल, याचा विचार केला नव्हता. मी यापूर्वी २०१३ मध्ये गिलमरविरुद्ध खेळली आहे, पण ती वेगळी लढत होती आणि खेळाडू म्हणून माझ्यात आता बराच बदल झाला आहे. आज आघाडी घेतल्यानंतर पकड सैल होऊ दिली नाही. त्यामुळे अखेर ही एकतर्फी लढत ठरली. या विजयामुळे आत्मविश्वास उंचावला असून लखनौमध्ये खेळल्या जाणाऱ्या सय्यद मोदी स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहे. याव्यतिरिक्त हैदराबादमध्ये बीएसीत होणाऱ्या सांघिक स्पर्धेत सहभागी होणार आहे.- पी. व्ही. सिंधू
सिंधूचा ‘मास्टर्स’ स्मॅश
By admin | Published: January 25, 2016 2:29 AM