सोफिया : भारताच्या एल. सरिता देवीने (६० किलो) ६९व्या स्टेÑंडजा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विजय मिळवताना उपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्चित केली. त्याचवेळी, ५१ किलोवजनी गटात पिंकी जांगडा हिला आपला गाशा गुंडाळावा लागला.माजी जागतिक आणि आशियाई विजेत्या सरिताने इटलीच्या मॅनचेस कोंसेहा हिचे आव्हान ३-२ असे परतावले. चुरशीच्या झालेल्या या लढतीत पंचांनी आपला निर्णय सरिताच्या बाजूने देताच तिच्या उपांत्यपूर्व फेरीतील मार्ग मोकळा झाला. दुसरीकडे, राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्य पदक विजेती पिंकीला रोमानियाच्या मारिया क्लाडिया नेचिताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. पंचांच्या निर्णयाच्या जोरावर क्लाडियाने ३-२ अशा विजयासह आगेकूच केली.दरम्यान, याआधी ड्रॉची घोषणा झाल्यानंतरच सीमा पूनियाचे पदक निश्चित झाले. पूनियाचा समावेश असलेल्या ८१ हून अधिक वजनी गटात केवळ तीन खेळाडूंचा सहभाग असून यामुळे ती थेट उपांत्य फेरीत खेळेल. उपांत्य फेरीत तिचा सामना स्थानीय खेळाडू मिहेला निकोलोवाविरुद्ध होईल. त्याचवेळी स्टार खेळाडू मेरी कोम ४८ किलो वजनीगटात एका विजयासह आपले पदक निश्चित करेल. सुरुवातीच्या फेरीत मेरीचा सामना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील तीनवेळची रौप्य विजेती आणि चार वेळची यूरोपीयन विजेती रोमानियाच्या स्टेलुटा दुटाविरुद्ध होईल. दखल घेण्याची बाब म्हणजे स्टेलुटाला आपल्या तिन्ही जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मेरी कोमविरुद्धच पराभूत व्हावे लागले होते.पुरुषांमध्ये भारताचा आघाडीचा मुष्टीयोद्धा शिव थापा उप-उपांत्यपूर्व फेरीत कझाखस्तानच्या अदिलेट कुरमेतोवविरुद्ध लढेल. तसेच, आशियाई खेळांमध्ये कांस्य पदक पटकावलेल्या सतीश कुमारला (९१ किलो हून अधिक वजनी गट) देखील अंतिम आठ स्थानांसाठी झुंजावे लागेल. डोक्याला झालेल्या दुखापतीतून सावरलेल्या विकास कृष्णला (७५ किलो) उप-उपांत्यपुर्व फेरीत मोरक्कोच्या मुस्तफा एल धाराबी याच्याविरुद्ध लढावे लागेल.
सरिता देवी, सीमा पूनिया यांचे पदक निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 2:39 AM