अल-वकराह (कतार) : फुटबॉल विश्वचषकाच्या ‘ग’ गटातील लढतीत कॅमेरुन आणि सर्बिया यांनी तब्बल सहा गोलचा वर्षाव केला. मात्र, यानंतरही सामना ३-३ असा बरोबरीत सुटल्याने दोन्ही संघांना अखेर एका गुणावर समाधान मानावे लागले.
अल जेनौब स्टेडियममध्ये या सामन्यात अनेक नाट्ये घडली. सातत्याने सामन्याचे पारडे बदलत राहिल्याने दोन्ही संघांच्या पाठीराख्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कॅमेरुनने सामन्यात पहिला गोल करत आघाडी घेतल्यानंतर पहिल्या सत्रातील अखेरच्या दोन मिनिटांमध्ये सर्बियाने दोन गोल करत २-१ अशी आघाडी मिळवली. यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच पुन्हा सर्बियाकडून गोल झाला. कॅमेरुननेही जोरदार प्रत्युत्तर देताना ६४ आणि ६६व्या मिनिटाला गोल करत सामना ३-३ असा बरोबरीत आणला. यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र, अखेरपर्यंत कोणालाही गोल करता न आल्याने सामना बरोबरीत राहिला. कॅमेरुनकडून जीन-चार्ल्स कॅस्टेलेटो (२९वे मिनिट), विन्सेंटट अबुबाकर (६३वे मिनिट) आणि एरिक मॅक्सिम (६६वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
विश्वचषक सामन्यात २ गोलने पिछाडीवर असताना पराभव टाळणारा कॅमेरुन पहिला आफ्रिकन देश ठरला. विश्वचषक सामन्यात २ गोलची आघाडी घेऊनही विजयापासून दूर राहण्याची सर्बियाची दुसरी वेळ. विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच सर्बियाने बरोबरीवर समाधान मानले. विन्सेंट अबुबाकर हा १९६६ नंतरचा विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा पहिला आफ्रिकन बदली खेळाडू ठरला.