जकार्ता : युवा विश्व चॅम्पियन शशी चोपडा (५७ किलो) याच्यासह सहा भारतीय मुष्टियोद्ध्यांनी आशियाई खेळाच्या परीक्षण स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली, तर चार अन्य खेळाडूंनी कांस्यपदक जिंकले.शशी आणि पवित्रा (६0 किलो) यांनी महिलांच्या ड्रॉमध्ये अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. पुरुषांत इंडिया ओपनचा सुवर्णपदकप्राप्त मनीष कौशिक (६0 किलो), श्यामकुमार (४९ किलो), शेख सलमान अन्वर (५२ किलो) व आशिष (६४) यांनी अंतिम फेरी गाठली.शशीने फिलिपाईन्सच्या रिजा पासुईतचा उपांत्य फेरीत ४-१ असा पराभव केला. आता तिची लढत थायलंडच्या रतचादापोर्न साओतोशी होईल. दुसरीकडे पवित्राने दक्षिण कोरियाच्या हवांग हेजंग हिचा ५-0 असा धुव्वा उडवला. तिची अंतिम फेरीत थायलंडच्या निलावन तेचासूप हिच्याशी गाठ पडेल.पुरुषांमध्ये राष्ट्रीय विजेत्या मनीषने चीनी तैपईच्या लाई चू येन याचा ५-0 असा पराभव केला. तो सुवर्णपदकासाठी जपानच्या रेंटारो किमुराविरुद्ध लढेल. ४९ किलो वजन गटात श्यामकुमार याच्याविरुद्ध मोहंमद फौद रेदजुआन याने माघार घेतली. श्यामकुमार इंडोनेशियाच्या मारियो ब्लासियूस याच्याशी दोन हात करील. तथापि, अन्वरने जपानच्या बाबा रुसेई याला ३-२ असे नमविले. आशिषने इंडोनेशियाच्या लिबर्टस घा याला नमवले. मोहंमद खान (५६ किलो), रितू ग्रेवाल (५१), पवन कुमार (६९) व आशिष कुमार (७५) यांनी कांस्यपदके जिंकली. (वृत्तसंस्था)- जिन्सन जॉन्सन याने पुरुषांच्या ८०० मीटर शर्यतीमध्ये सहजपणे सुवर्ण पदकाची कमाई केली. यासह भारताने १३ सुवर्ण पदकांसह एकूण २२ पदक जिंकण्यात यश मिळवले. भारतीय अॅथलेटिक्स खेळाडूंनी स्पर्धेच्या अंतिम दिवशी तीन सुवर्ण कमाई केली.भारताने पुरुष व महिलांच्या 4७400 मीटर स्पर्धेत सुवर्ण यश मिळवले. त्याचवेळी, सरिता सिंगने महिलांच्या तार गोळा फेकमध्ये रौप्य, तर कमलराज कणराज याने पुरुष तिहेरी उडीमध्ये कांस्य पटकावले. जॉन्सनने १ मिनिट ४७.९६ सेकंदासह सुवर्ण पटकावले. तार गोळाफेकमध्ये सरिताने गत आशियाई विजेत्या चीनच्या ल्यो ना को कोई (७२.११) नंतर ६१.७५ मीटरची फेक करुन रौप्य जिंकले.
भारताच्या सहा मुष्टीयोद्धांची अंतिम फेरीत धडक; चार भारतीय खेळाडूंनी केली कांस्य पदकाची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 1:29 AM