ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक निवडीची घडी आता जवळ आली आहे. या पदासाठी बीसीसीआयकडे एकूण 10 जणांनी अर्ज केले असून त्यापैकी सहा जणांची नावे मुलाखतीसाठी निश्चित करण्यात आली आहेत. या सर्वांमध्ये रवी शास्त्रीचे नाव सर्वात पुढे आहे.
मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीची बैठक सोमवारी होणार आहे. दरम्यान मुख्य प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयला प्राप्त झालेल्या इच्छुकांच्या अर्जांमध्ये रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग, टॉम मुडी, रिचर्ड पायबस, डोडा गणेश, लालचंद राजपूत, लान्स क्लुझनर, राकेश शर्मा, फिल सिमन्स आणि उपेंद्र ब्रह्मचारी यांचा समावेश आहे.
दरम्यान, क्रिकेट सल्लागार समिती या इच्छुकांपैकी सहा जणांची मुलाखत घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सहा जणांमध्ये शास्त्री, सेहवाग, मुडी, सिमन्स, पायबस आणि राजपूत यांचा समावेश आहे. तर लान्स क्लूजनरचे नाव राखीव ठेवण्यात आले आहे. पण त्याची निवड होण्याची शक्यता कमीच आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीनंतर कर्णधार विराट कोहलीसोबत झालेल्या विवादानंतर अनिल कुंबळेने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद रिक्त आहे.
नव्या प्रशिक्षकाचा कार्यकाळ 2019 साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत म्हणजेच 2019 पर्यंत असेल. सध्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर असलेल्या रवी शास्त्रीने सुरुवातीला या पदासाठी अर्ज केला नव्हता. मात्र बीसीसीआयने मुदत वाढवल्यानंतर शास्त्रीने या पदासाठी अर्ज केला होता.
बीसीसीआयने प्रशिक्षकाच्या नियुक्तीच्या पद्धतीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार क्रिकेट सल्लागार समितीला दिले आहेत. या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांचा समावेश आहे.