ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 9 - भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये दहा वर्षांपूर्वी स्टुअर्ट ब्रॉडला मारलेल्या सहा चेंडूत सहा षटकारांच्या आठवणी क्रिकेटप्रेमींच्या मनात अजूनही ताज्या आहेत. आता पाकिस्तानच्या एका फलंदाजाने ट्वेंटी-20 क्रिकेमध्ये सलग सहा षटकार मारण्याचा कारनामा केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा विक्रम मोजक्याच क्रिकेटपटूंन करता आला आहे. त्यात आता पाकिस्तानचा कसोटी कर्णधार मिसरबाह उल हक याचेही नाव सामील झाले आहे. मिसबाहने हाँगकाँग ब्लिट्झ-20 स्पर्धेत हाँगकाँग आयलँडकडून खेळताना सलग सहा चेंडूवर सहा षटकार ठोकले. मात्र ही कामगिरी त्याने एका षटकात सहा षटकार मारून हा विक्रम केलेला नाही.
हंग होम जग्वार्सविरुद्ध खेळताना मिसबाहने इम्रान आरिफने टाकलेल्या 18 व्या षटकात शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले. त्यानंतर ऑश्ले कँडीच्या षटकातील पहिल्या चार चेंडूवर चार षटकार ठोकत मिसबाने हा विक्रम केला. मिसबाने 37 चेंडूत 7 षटकार आणि चार चौकारांसह नाबाद 82 धावा कुटल्या. त्या जोरावर मिसबाच्या संघाने 20 षटकात 216 धावा कुटल्या आणि सामना 33 धावांनी जिंकला.