लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात सर्व काही आलबेल नसल्याचे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे. कर्णधार विराट कोहलीसह काही वरिष्ठ खेळाडू मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेंवर नाराज आहेत. कुंबळे यांच्या मार्गदर्शनाची पद्धत वरिष्ठ खेळाडूंना पटत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतीय संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध चार जूनला होणाऱ्या सामन्याची तयारी करीत असताना संघात सर्वकाही आलबेल नसल्याची बातमी आली आहे. बीसीसीआयच्या सल्लागार समितीवर असणारे सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या वादामध्ये कुंबळे आणि वरिष्ठ खेळाडूंमध्ये समेट घडवून आणतील, अशी अपेक्षा आहे. सचिन, सौरभआणि लक्ष्मणच्या सल्लागार समितीनेच प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेची निवड केली होती. भारतीय संघासाठी सध्या प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, कुंबळे यांना यामध्ये थेट प्रवेश दिला आहे. वर्ल्डकप २०१९ पर्यंत कुंबळे यांना प्रशिक्षकपदावर कायम ठेवले जाण्याची शक्यता असताना आता अचानक हा वाद उभा राहिला आहे. मागच्या वर्षभरात कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने सर्वच कसोटी, एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. (वृत्तसंस्था)
कर्णधार कोहली कोच अनिल कुंबळेंवर नाराज?
By admin | Published: May 31, 2017 12:40 AM