कोलकाता : फिरकी गोलंदाजांना पोषक संथ खेळपट्टीवर तयारी करण्याविषयी कोलकाता नाईट रायडर्सवर टीका करणाऱ्यांना कर्णधार गौतम गंभीरने चोख प्रत्युत्तर दिले. तीन पर्वात दोनदा विजेतेपद पटकावण्यासाठी संघाला सर्वच विभागात सातत्याने चांगली कामगिरी करावी लागते, असे तो म्हणाला.२0१२ आणि २0१४ साली चॅम्पियन ठरलेला संघ फिरकी गोलंदाजांवर अवलंबून होता; परंतु आमची फलंदाजीही मजबूत असल्याचे गौतम गंभीर म्हणाला.तो म्हणाला, ‘‘केकेआर संथ खेळपट्टीवर तयारी करतो आणि त्यावरच जिंकतो असे लोक म्हणतात; परंतु तुम्ही फक्त संथ खेळपट्टीवर खेळून दोनदा विजेतेपद पटकावू शकत नाही. तुम्हाला खेळातील प्रत्येक विभागात चांगले खेळावे लागते आणि आम्ही तसे केले. फिरकी गोलंदाजांना पोषक असणारी खेळपट्टी ही स्पोर्टिंगदेखील असते. फलंदाजीसाठी पोषक असणाऱ्या परिस्थितीत चांगली फलंदाजी करणारेदेखील आमच्याकडे फलंदाज आहेत.’’केकेआरने गेल्या वर्षी चॅम्पियन टी-२0 लीगमध्ये सलग १४ सामने जिंकले होते. गंभीर म्हणाला, आम्ही घरच्या मैदानाबाहेरदेखील चांगली कामगिरी केली आहे. गेल्या चार वर्षांत आम्ही दोनदा विजेतेपद जिंकले असून सलग १४ सामनेही जिंकले आहेत.’’ ईडनची खेळपट्टी नवीन असल्याने ती कशा असेल हे सांगणे कठीण असल्याचेही गंभीरने सांगितले.केकेआर मुंबई इंडियन्सला सहज घेणार नाही, कारण प्रत्येक संघ हा समानरूपाने संतुलित आहे, असे गंभीर म्हणाला. तो म्हणाला, ‘‘मी कोणत्याही संघाला सहज घेऊ शकत नाही. आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी केल्यास आम्हाला पराभूत करणे कठीण आहे. आम्हाला स्वत:वर विश्वास आहे; परंतु अतिआत्मविश्वास नाही.’’गेल्या वर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या रॉबिन उथप्पाने आज सराव केला नाही; परंतु त्याच्या फिटनेसविषयी चिंता नसल्याचे गंभीरने सांगितले. तो म्हणाला, ‘हा ऐच्छिक सराव होता. रॉबिनने पूर्ण हंगामात चांगली कामगिरी केली आहे आणि सामन्याच्या एक दिवस आधी कसा सराव करायचा हे खेळाडूवर अवलंबून आहे.’ (वृत्तसंस्था)
संथ खेळपट्टीवर दोन विजेतेपद कठीण
By admin | Published: April 07, 2015 11:31 PM