लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जळगावच्या स्नेहल पाटीलने अल्टिमेट पिकलबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत अपेक्षित दबदबा राखताना १९ वर्षांखालील आणि खुल्या गटाच्या अंतिम सामन्यात बाजी मारताना दोन सुवर्णपदके पटकावली. ऐकांश चौहानने १६ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात बाजी मारली.
अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेच्या (एआयपीए) मान्यतेने प्रो वर्ल्ड टॅलेंट स्पोर्ट्सच्या वतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत स्नेहलने १९ वर्षांखालील गटाच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात लक्षिता चितळेचे कडवे आव्हान १५-१३, असे परतावले. लक्षिताने प्रत्येक गुणासाठी स्नेहलला चांगली लढत दिली. मात्र, अखेरच्या क्षणी स्नेहलने आपल्या अनुभवाच्या जोरावर बाजी मारताना सुवर्ण पटकावले. काव्या एन. हिने कांस्यपदक जिंकताना सौम्य लेलेला ११-३ असे नमवले.
यानंतर खुल्या गटातही जबरदस्त वर्चस्व राखताना स्नेहलने अंतिम सामन्यात प्रियांका मेहताचे आव्हान ११-२, ११-६, असे सहज परतवले. या लढतीत स्नेहलच्या वेगवान आणि आक्रमक खेळापुढे प्रियांकाला फारशी संधी मिळाली नाही. कांस्यपदकाच्या लढतीत अनुजा महेश्वरीने अनपेक्षित विजय मिळवताना अनुभवी वृषाली ठाकरेचा १५-११, असा पराभव केला.
ऐकांशचा शानदार विजय१६ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात ऐकांश चौहानने बाजी मारताना स्ताव्य भासीन याचा १५-१४ असा थरारक पराभव करत सुवर्ण पटकावले. वंश रुहेलाने कांस्यपदक जिंकताना स्थावीर भासीनला ११-० असे सहज नमवले.