मुंबई: भारतातील स्नूकरचे भविष्य उज्ज्वल असल्याचे दोन वेळचा माजी आशियाई स्नूकर आणि राष्ट्रीय चॅम्पियन यासिन मर्चंट याने म्हटले आहे. एनएससीआय बॉल्कलाइन अखिल भारतीय स्नूकर स्पर्धेचे औचित्य साधून मुंबईतील क्यूईस्ट्सना मार्गदर्शन आणि विकासासाठी केलेल्या योगदानाबद्दल नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय), कार्यकारी व्यवस्थापकीय समिती आणि बॉल्कलाइन टूर्नामेंट समितीकडून हा प्रसिद्ध खेळाडूचा प्रिन्स हॉल, एनएससीआय येथे स्मृतिचिन्ह देउन सत्कार करण्यात आला.
माझा असा सन्मान होईल, अशी केली अपेक्षा नव्हती.या सत्काराने मी भारावलो आहे. शिष्यांमुळे माझा सत्कार होत आहे, हे मला ठाउक आहे. प्रशिक्षक हा त्याच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीवरूनच ओळखला जातो. माझ्या विद्यार्थ्यांनी केवळ खेळाडू म्हणून जे काही मिळवले आहे त्याबद्दलच नव्हे तर त्यांनी स्वतःचे आचरण आणि त्यांनी जपलेल्या शिस्तीचा मला खूप अभिमान आहे. मी त्यांच्यासोबत दोन तास सराव करतो आणि मी फक्त अर्धा तास टेबलावर असतो, असे ते म्हणाले. एनएससीआयने आयोजित केलेल्या बॉल्कलाइन स्नूकर स्पर्धेत खेळण्याचाही मला सन्मान वाटतो, असे मर्चंट पुढे म्हणाले.
भारतातील स्नूकरचे भविष्य उज्ज्वल आहे. स्पर्धांची संख्या आणि आता प्रशिक्षण घेण्यावर अधिक भर पाहता आपल्याकडे स्नूकरसाठी अनुकूल वातावरण आहे. पण, अजूनही बर्याच गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. अधिक चांगल्या पायाभूत सुविधांची गरज आहे. टेबल्स, कोर्ट आणि अॅकॅडमीबाबत सुधारणा आवश्यक आहे, असे अनुभवी स्नूकरपटू यासिन यांनी सांगितले. शिवाय, आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरासाठी पात्र ठरण्यादृष्टीने आपल्या देशांतर्गत स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अव्वल परदेशी खेळाडूंना आमंत्रित केले पाहिजे, अशीही सूचना मर्चंट यांनी केली.
मोठ्या बक्षिसांच्या व्यावसायिक (प्रोफेशनल) स्पर्धांची संख्या वाढल्या पाहिजेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आमच्याकडे अशा स्पर्धा असाव्यात जिथे आयोजक परदेशी सहभागींना बोलावतील. त्यांनी (परदेशी) येऊन आपल्या खेळाडूंना स्नूकर म्हणजे काय ते शिकवावे. ते ज्या स्तरावर खेळत आहेत ते इथं दिसण्यापेक्षा खूप वेगळं आहे. आपल्या भारतातील एक-दोन खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत, पण ते पुरेसे नाही. भविष्याबद्दल बोलायचे झाल्यास आपल्याकडे अनेक युवा आणि गुणवान खेळाडूंचा भरणा आहे. तो आणखी वाढेल, असे ते म्हणाले.
डिसेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या मुंबईतील तरुण प्रतिभावान खेळाडूंच्या कामगिरीचीही दखलही यावेळी एनएससीआयने घेतली. राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या स्थानी असलेल्या स्पर्श फेरवानी आणि इशप्रीत सिंग चढ्ढा यांच्यासह रायन राझमी, क्रिश गुरबक्षनी आणि सुमेहर मागो या युवा खेळाडूंनाही यावेळी सन्मानीत करण्यात आले.