बर्लिन : फिफा विश्वकप स्पर्धेच्या अंतिम लढतीत अर्जेंटिनाविरुद्ध विजय मिळवित विश्वविजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या जर्मनीमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. जर्मनी संघाने ऐतिहासिक चौथे विजेतेपद पटकाविल्यानंतर चाहत्यांनी रात्रभर जल्लोष केला.जर्मनीने अर्जेंटिनाविरुद्ध १-०ने विजय मिळविल्यानंतर बर्लिनमध्ये रविवारी रात्री आतशबाजी करण्यात आली. चाहते शहरातील मुख्य मार्गावर जल्लोष करीत असल्याचे चित्र अनुभवायला मिळाले. गाड्यांचे हॉर्न वाजवून आनंद साजरा करणाऱ्या जर्मनीच्या अनेक चाहत्यांच्या हातात राष्ट्रध्वज होता. राजधानीतील मुख्य स्थळावर २,५०,०००पेक्षा अधिक चाहते आनंदोत्सवात सहभागी झाल्याचे दिसून आले. त्यात कुणी गात होते, कुणी नाचत होते. ‘हा विजय आनंददायी आहे’ आणि ‘सुपर जर्मनी’ असे नारे देत जर्मनवासी आनंदोत्सव साजरा करीत होते. पश्चिम प्रांतातील उत्तर वेस्टफालियामधून येथे दाखल झालेला ३५वर्षीय बियान्सा होफमॅन म्हणाला, ‘आम्ही रात्रभर आनंद साजरा करणार आहोत.’ चाहत्यांना आनंद साजरा करण्यासाठी शहरातील तथाकथित फॅन मॉईलला वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. २०वर्षीय कार्सटन ग्लॅसर म्हणाला, ‘हा विजय महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी हा पहिला विजय आहे. जर्मनीचा संपूर्ण संघ खेळत होता तर अर्जेंटिनाकडे केवळ मेस्सी होता.’ राजधानीच्या पश्चिमेकडील शॉपिंग स्थळ असलेल्या कुर्फरस्टेडॅममध्ये चाहत्यांनी आतशबाजी केली आणि मोठा राष्ट्रध्वज फडकावला. हे स्थळ खेळाच्या जल्लोषासाठी महत्त्वाचे मानले जाते. अनेक चाहत्यांनी हा विजय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. २४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जर्मनीने विश्वविजेतेपद पटकाविले. यापूर्वी १९९०मध्ये पश्चिम जर्मनीने अर्जेंटिनाचा पराभव केला होता. ३४वर्षीय थोर्सटन किन्सेर म्हणाला, ‘संयुक्त जर्मनीसाठी हा विजय महत्त्वाचा आहे. यामुळे आम्ही एक असल्याचे सिद्ध झाले.’ एक प्रवक्ता म्हणाला, ‘सामना प्रारंभ होण्यास अनेक तास शिल्लक असताना फॅन मॉईलवर जवळजवळ २ लाख चाहते जमले होते. याव्यतिरिक्त शेकडो चाहते रिओ दी जानेरिओतील मरकाना स्टेडियममध्ये खेळली गेलेली अंतिम लढत बघण्यासाठी बीअर गार्डन्स, बार, क्रीडा क्लबमध्ये जमले होते.’ ४२वर्षीय एनेट व्होकर म्हणाले, ‘जर्मनीच्या जर्सीवर चौथ्या स्टारसाठी २४ वर्षांची प्रतीक्षा संपली. संयुक्त जर्मनीसाठी हे विजेतेपद महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थळावर असलेल्या जर्मनीच्या अलेक्सांद्र गेर्स्टने टिष्ट्वटरच्या माध्यमातून संघाचे अभिनंदन केले.’ आपल्या जर्सीवरील चौथ्या ताऱ्याकडे इशारा करताना गेर्स्ट म्हणाला, ‘ताऱ्यांच्या जगात जाणकार असल्यामुळे आम्ही पुन्हा एक मिळविला.’ (वृत्तसंस्था)
जर्मनीमध्ये जल्लोषाला उधाण
By admin | Published: July 15, 2014 2:24 AM