लंडन : विम्बल्डनटेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात स्पेनचा कार्लोस अल्काराझ याच्याकडून पराभूत होत असताना रॅकेट तोडणे सर्बियाच्या नोवाक जोकोविचला चांगलेच महागात पडले. आयोजकांनी त्याला असभ्य कृतीबद्दल एक लाख २७ हजार रुपयांचा दंड (६.११७ पौंड) ठोठावला.
रविवारी साडेचार तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या लढतीत २३ ग्रॅन्डस्लॅमचा मानकरी जोकोविच २० वर्षांच्या अल्काराझकडून पराभूत झाला होता. पाचव्या आणि अखेरच्या सेटमध्ये जोकोविच अल्काराझची सर्व्हिस ब्रेक करण्यात अपयशी ठरला आणि पुढे पराभूत झाला. त्याने लगेचच लाकडी नेट पोलवर रॅकेट ठोकून निराशा व्यक्त केली. पंच फर्गस मर्फी यांनी जोकोला रॅकेट स्मॅशिंगवरून क्रीडा संहिता भंग होत असल्याचीे ताकीद दिली. त्यानंतर सातवेळा विम्बल्डन विजेता राहिलेल्या जोकोवर दंड ठोठावण्यात आला. ही रक्कम त्याच्या उपविजेतेपदाच्या रोख बक्षिसाच्या चेकमधून कपात करण्यात येणार आहे.