नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील निराशाजनक कामगिरीमुळे हरभजन सिंगवर दडपण आले आहे. भारताचा माजी फिरकीपटू व्यंकटपती राजू याच्या मते या अनुभवी फिरकीपटूने पुनरागमन करताना आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी गरजेपेक्षा अधिक प्रयत्न केल्यामुळे तो फ्लॉप झाला. फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवलेल्या या लढतीत हरभजनने २५ षटकांत केवळ एक बळी घेतला. भारताला या लढतीत ६३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे. श्रीलंकेत २२ वर्षांपूर्वी मालिका विजय साकारणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य असलेला राजू म्हणाला, ‘तीन फिरकीपटूंना खेळविण्याची रणनीती यशस्वी ठरण्यासाठी धावफलकावर पुरेशा धावा असणे आवश्यक असते. ज्या वेळी भारत तीन फिरकीपटूंसह खेळत होता, त्या वेळी वीरेंद्र सेहवागसारखा फलंदाज होता. तो खोऱ्याने धावा काढत होता. ४०० चा स्कोअर नेहमी उपयुक्त ठरतो. याव्यतिरिक्त संघात अष्टपैलू गोलंदाजही होते. सध्याचा संघ युवा असून अनुभवानंतर या संघाची कामगिरी सुधारेल.’राजू म्हणाला, ‘१९९३ मध्ये मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेत विजय मिळविणाऱ्या संघाचा सदस्य होतो. फिरकी ही त्या संघाचे शक्तिस्थळ होते. श्रीलंका संघात मुथय्या मुरलीधरन व्यतिरिक्त चामिंडा वास होता. तो विकेट घेण्यात वाक् बगार होता. आमच्या खेळाडूंना स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव होता. त्यामुळे तेथील खेळपट्ट्यांवर आम्हाला अडचण भासली नाही. ज्या वेळी आम्ही आॅस्ट्रेलिया किंवा इंग्लंडविरुद्ध भारतात खेळलो, त्या वेळी ४०० ते ५०० धावांचा स्कोअर केला.’पहिल्या कसोटी सामन्यातील श्रीलंकेच्या विजयाचे शिल्पकार रंगाना हेराथ व थारिंडू कौशल यांची राजूने प्रशंसा केली. त्यांना स्थानिक वातावरणात खेळण्याचा लाभ मिळाला, असेही राजूने सांगितले. गोलंदाजी शैलीमध्ये बदल करण्यासाठी हरभजनला पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी व्हावे लागले. त्यानंतर त्याने संघातील स्थान गमावले. आता त्याने पुनरागमन केले असून अतिरिक्त प्रयत्न केले. त्याच्याकडे मोठा अनुभव असून कुठल्या परिस्थितीत कसे खेळायचे याची त्याला चांगली कल्पना आहे. पण ज्या वेळी खेळाडू पुनरागमन करीत असतो, त्या वेळी तो आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी गरजेपेक्षा अधिक प्रयत्न करतो, ही मुख्य अडचण ठरते. अतिरिक्त प्रयत्न अनेकदा अपयशाचे कारण ठरतात.- व्यंकटपती राजूफिरकीपटूसाठी कर्णधाराचा विश्वास असणे महत्त्वाचे असते, असे मत भारताचे दिग्गज फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांनी व्यक्त केले. प्रसन्ना म्हणाले, ‘‘कर्णधाराचा विश्वास फिरकीपटूसाठी महत्त्वाचा असतो. एक गोलंदाज म्हणून तुम्ही किती उपयुक्त आहात, हे समजण्याची क्षमता कर्णधारामध्ये असणे आवश्यक आहे.गोलंदाजाला आवडीच्या क्षेत्ररक्षणासह गोलंदाजी करण्याची मुभा मिळायला पाहिजे.’’ कर्णधार एमएके पतौडीसोबत जसे माझे संबंध होते त्याप्रमाणे फिरकीपटूचे आपल्या कर्णधारासोबत संबंध असायला हवेत, असे प्रसन्ना म्हणाले. प्रसन्ना यांनी सांगितले, ‘‘पतौडीसोबत मी एकवेळ क्षेत्ररक्षण सजविल्यानंतर मी काय करणार आहे, याची त्यांना कल्पना येत होती. (वृत्तसंस्था)
...त्यामुळे हरभजन अपयशी
By admin | Published: August 18, 2015 10:54 PM