ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी शालेय जीवनात स्वत: क्रिकेटपटू होते तसेच क्रिकेटचे चाहतेही होते. तरीही महात्मा गांधींनी जवळपास तीस वर्ष भारतातील एका क्रिकेट स्पर्धेचा जोरदार विरोध केला होता. त्याकाळी भारतात पेंटेंगुलर क्रिकेट स्पर्धा खेळली जायची. या स्पर्धेत एकूण पाच संघ खेळायचे. त्याकाळी क्रिकेट विश्वातील ही लोकप्रिय स्पर्धा होती.
या स्पर्धेत क्रिकेटपेक्षा धर्म अधिक प्रभावी झाल्याने महात्मा गांधींनी या स्पर्धेला विरोध केला होता. या स्पर्धेची सुरुवात १८७७ साली बॉम्बे जिमखान्यावर झाली. इंग्रज आणि झोरास्ट्रियन क्रिकेट क्लब (पारसी संघ)मधील दोन दिवसीय सामन्याने झाली. दोन संघांमध्ये होणारी ही स्पर्धा १९०७ साली हिंदू क्रिकेट संघाच्या प्रवेशानंतर तीन संघांमध्ये बदलली.
१९१२ साली मुस्लिमांनी धर्माच्या आधारावर मोहम्मद जिमखाना बनवून मुस्लिम क्रिकेट संघ बनवला. त्यानंतर पेंटेंगुलर स्पर्धेचे स्वरुप चौरंगी झाले. पण क्रिकेटपेक्षा धर्माचा प्रभाव वाढला. धर्माच्या आधारावर संघ बनवून खेळली जाणारी ही स्पर्धा इतकी लोकप्रिय होती की, पहिल्या विश्वयुध्दाच्या दरम्यानही ही स्पर्धा सुरु होती.
लाहोर, इस्लामाबाद, ढाका श्रीलंका इथून लोकही स्पर्धा बघायला यायचे. त्याच दरम्यान स्वातंत्र्याच्या मागणीनेही जोर धरला होता. त्यावेळी गांधींजी स्वातंत्र्य लढयाचे नेतृत्व करत होते. धर्माच्या आधारावर फूट पाडा आणि राज्य करा ही इंग्रजांची रणनिती होती. म्हणून इंग्रज या स्पर्धेला प्रोत्साहन देत होते. हळूहळू या स्पर्धेत जाती-पातीचा समावेश झाला.
गांधींच्या स्वातंत्र्य लढाईची धार कमी करणे हा त्यामागे उद्देश होता. गांधींना इंग्रजांचा हेतू आधीपासूनच माहित होता. त्यामुळे ही स्पर्धा बंद करण्यासाठी गांधींजी आग्रही होते. अखेर १९४६ साली ही स्पर्धा कायमची बंद केल्याची घोषणा करण्यात आली.