नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरुवात भारतीय टेनिससाठी विशेष सुखद झाली नाही. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारी एकेरीतील स्टार खेळाडू सोमदेव देव वर्मनने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली. सोमदेव गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे त्रस्त होता. त्याचा प्रभाव त्याच्या कारकिर्दीवर झाला आणि अखेर त्याने टेनिसमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सोमदेवने टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘२०१७ ची सुरुवात नव्या पद्धतीने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारत आहे. सर्वांनी अनेक वर्षे मला पाठिंबा दिला आणि माझ्यावर प्रेम केले त्यासाठी आभारी आहे.’या ३१ वर्षीय खेळाडूची कारकीर्द २०१२ मध्ये खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे संपुष्टात आली. तो दुखापतीतून सावरत असताना पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो विशेष कारणामुळे टेनिसपासून दूर होता. तो प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. सोमदेवने २००८ मध्ये टेनिसमध्ये पदार्पण केले त्यावेळी तो भारताचा एकेरीतील स्टार खेळाडू होता. भारताच्या डेव्हिस कप संघाचा नियमित सदस्य असलेला सोमदेव १४ सामने खेळला आणि २०१० मध्ये भारताला विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.सोमदेवने एटीपी टूर-२००९ चेन्नई ओपनमध्ये वाईल्ड कार्ड प्रवेश मिळवताना अंतिम फेरी गाठली होती. त्याचप्रमाणे २०११ मध्ये दक्षिण आफ्रिका ओपनमध्ये अंतिम फेरी गाठली होती. सोमदेवने ग्वांग्झूमध्ये २०१० च्या आशियाई स्पर्धेत एकेरी व दुहेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. २०११ मध्ये तो अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला होता. (वृत्तसंस्था)दोन वर्षांपूर्वी खेळला अखेरचा सामनासोमदेव जवळजवळ एक दशक भारताचा एकेरीतील सर्वोत्तम खेळाडू मानला जात होता. सोमदेवला २०११ मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. सोमदेव जवळजवळ दोन वर्षांपूर्वी आपला अखेरचा सामना खेळला. त्यावेळी एफ-१० फ्युचर्स इव्हेंटमध्ये सेबेस्टियन फेंसेलोविरुद्ध त्याला ३-६, २-६ ने पराभव स्वीकारावा लागला होता. सोमदेवने २००८ मध्ये डेव्हिस कपमध्ये कारकिर्दीचा प्रारंभ केला. त्यानंतर एकेरीमध्ये त्याने सातत्याने भारताचे नेतृत्व केले. त्याने १४ सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान सोमदेवने चेक प्रजासत्ताकच्या जिरी वेलसी व सिब्रयाच्या ड्यूसन लायोविच यांच्यासारख्या खेळाडूंचा पराभव केला. २०१० मध्ये भारताला विश्व गटात स्थान मिळवून देण्यात सोमदेवची भूमिका महत्त्वाची ठरली होती.२००९ मध्ये चेन्नई ओपन आणि २०११ मध्ये दक्षिण आफ्रिका ओपनमध्ये त्याने अंतिम फेरी गाठली होती. १९९८ मध्ये लिएंडर पेसने टुर इव्हेंटमध्ये जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय खेळाडूची एकेरीतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. सोमदेवची कारकीर्द
२००८ मध्ये पदार्पण२००९ व २०११ मध्ये दक्षिण आफ्रिका ओपनमध्ये अंतिम फेरी२०१० मध्ये भारताला विश्व गटात स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका.
२०११ मध्ये अर्जुन पुरस्काराचा मानकरी
१४ डेव्हिस कप लढतीमध्ये प्रतिनिधित्व
२०१२ पासून सातत्याने दुखापतीमुळे त्रस्त.