चेन्नई : भारताचे दोन अव्वल एकेरी टेनिसपटू सोमदेव देववर्मन आणि साकेत माइनेनी यांनी आपल्या लौकिकानुसार खेळ करताना एटीपी चेन्नई ओपन स्पर्धेच्या पात्रता फेरीत विजयी आगेकूच केली. सहाव्या मानांकित सोमदेवने सहज विजय मिळवताना आपल्याच देशाच्या एन. विजय सुंदर प्रशांतचा ६-२, ६-३ असा धुव्वा उडवून शानदार विजयी सलामी दिली. तर पाचव्या मानांकित साकेतनेदेखील सहज विजयासह कूच करताना सनम सिंगचे आव्हान ६-२, ६-४ असे संपुष्टात आणले. दुसऱ्या बाजूला भारताच्या एन. श्रीराम बालाजी यानेदेखील पात्रता फेरीत विजयी आगेकूच करताना सातव्या मानांकित हैंस पोडलीनिक केस्टीलो याला पराभवाचा धक्का दिला. अनपेक्षित निकाल लागलेल्या या सामन्यात एकहाती वर्चस्व राखताना बालाजीने केस्टीलोला ६-२, ६-४ असे पराभूत केले. तर जीवन नेदुनचेझियान आणि प्रजनेश गुणेश्वरन यांचे पहिल्या फेरीतच आव्हान संपुष्टात आले. जीवनने द्वितीय ब्रिटनच्या मानांकित जेम्स वॉर्डविरुद्ध झुंजार खेळ केला. मात्र अनुभवी वॉर्डने आपला हिसका दाखवताना ६-४, ६-३ अशा विजयासह जीवनला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच आठव्या मानांकित जोजेफ कोवालिकने केलेल्या आक्रमक खेळापुढे निभाव न लागल्याने प्रजनेशला ३-६, ०-६ अशा दारुण पराभवासह स्पर्धेतील गाशा गुंडाळावा लागला. त्याचवेळी जागतिक क्रमवारीतील २६२वा खेळाडू आणि वाइल्ड कार्ड मिळवलेल्या भारताच्या रामकुमार रामनाथनला आपल्या पहिल्याच सामन्यात जागतिक क्रमवारीतील ९८व्या स्थानी असलेल्या स्पेनच्या डॅनियल टे्रवरविरुद्ध लढावे लागेल. तसेच विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला स्वित्झर्लंडचा स्टेनिसलास वावरिंका आणि द्वितीय मानांकित केविन एंडरसन यांना पहिल्या फेरीत चाल मिळाली आहे. (वृत्तसंस्था)
सोमदेव, साकेत यांची आगेकूच
By admin | Published: January 03, 2016 1:36 AM