नवी दिल्ली : सोमदेव देवबर्मन याने येथील आर. के. खन्ना टेनिस कोर्टवर सनसनाटी विजयाची नोंद करीत, शुक्रवारपासून सुरू झालेल्या चेक प्रजासत्ताकाविरुद्धच्या डेव्हिस चषक विश्व ग्रुप प्ले आॅफ लढतीत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. सलामीला युकी भांबरी पराभूत झाल्यानंतर, भारत माघारला होता. सोमदेवने मात्र जिरी वेस्लेचा पराभव करीत सामना बरोबरीत आणला आहे.सोमदेवने यंदाच्या सत्रात मोठा विजय साजरा करीत, विश्व क्रमवारीत ४० व्या स्थानावर असलेल्या वेस्लेला सरळ सेटमध्ये ७-६, ६-४, ६-३ ने पराभूत केले. डेव्हिस चषकात रँकिंगला स्थान नसते हे सोमदेवने विजयाद्वारे सिद्ध केले. त्याआधी युकीला ८५ वा मानांकित लुकास रोसोल याने २-६, १-६, ५-७ अशा फरकाने पराभूत केले होते. सोमदेव २०१० पासून या कोर्टवर एकही सामना हरलेला नाही. दुसरीकडे वेस्ले हा देखील डेव्हिस चषकात एकहीसामना जिंकला नाही. सोमदेवसाठी हे वर्ष चांगले उजाडले नव्हते. त्याला ४०२ वा मानांकित एमिलियो गोमेज याच्याकडूनही पराभवाचे तोंड पाहावे लागले होते; पण देशाची शान येताच सोमदेवने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत सामना जिंकला. तब्बल ३१ ते ३४ डिग्री तापमान, वेगवान वारे आणि ढगाळ वातावरणात ही लढत खेळविण्यात आली.सोमदेवने सामन्यादरम्यान फिटनेस आणि विजयाची जिद्द स्वत:च्या खेळातून दाखवून दिली. चपळ खेळ करीत वेगवान फटकेदेखील मारले. त्याआधी १ तास ५५ मिनिटे चाललेल्या पहिल्या सामन्यावर रोसोलने बराचकाळ वर्चस्व गाजवित युकीला धूळ चारली. युकी आणि रोसोल यांनी आक्रमक सुरुवात केली; पण नंतर युकी फोरहॅण्ड फटक्यात माघारला. दुसऱ्या सेटमध्येही एकतर्फी खेळ झाला.तिसऱ्या सेटमध्ये युकीने स्वत:ला सावरले आणि चांगला खेळ केला; पण प्रतिस्पर्धी खेळाडू युकीची सर्व्हिस तोडण्यात यशस्वी ठरल्याने त्याला दोनदा सेट पॉइंटही मिळाले. रोसोलने फोरहँडचे फटके मारून युकीला चकवित सामना जिंकला. (वृत्तसंस्था)तिसऱ्या सेटमध्ये माझ्याकडे संधी होती; पण मी ती गमावली. ११ व्या गेममध्ये ४०-० अशी आघाडी असताना, चौथा सेट जिंकलो असतो, तर कदाचित सामना जिंकता आला असता;पण प्रतिस्पर्धी रोसोलने मला सामन्यात परतण्याचीसंधीच दिली नाही.- युकी भांबरी.
सोमदेवचा सनसनाटी विजय
By admin | Published: September 19, 2015 4:02 AM