कोलकाता : आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर सुरू असलेल्या चर्वितचर्वणामुळे भारताचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधार महेंद्रसिंह धोनी त्रस्त झाला आहे. निवृत्तीबाबतच्या प्रश्नांमुळे माझ्या प्रदीर्घ कालावधीपर्यंत खेळण्याच्या योजनेत बदल होणार नसल्याचे महेंद्रसिंह धोनीने रविवारी स्पष्ट केले. आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ बांगलादेशला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, ‘‘निवृत्तीच्या प्रश्नावर महिनाभरापूर्वी उत्तर दिले होते. त्यामुळे या उत्तरात बदल होणार नाही. प्रश्न जर तोच असेल तर मी कुठेही असलो तरी उत्तरात बदल होणार नाही. सध्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा विचार नाही.’’ ३४ वर्षीय धोनीने डिसेंबर २०१४ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. निवृत्तीबाबत सातत्याने प्रश्न विचारण्यात येत असल्यामुळे त्रस्त झालेला धोनी म्हणाला, ‘‘प्रश्न होत राहतील, तुम्ही मला पत्र पाठवा किंवा विनंती करा. तुम्हाला जर प्रश्न विचारण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले तर याचा अर्थ असा नाही, की तोच तो प्रश्न वारंवार विचारण्यात यावा. आधुनिक युगात सर्व काही मीडिया कव्हर करीत आहे. कुठे काहीही घडले तरी भारतात प्रश्न उपस्थित केले जातात. जर आम्ही विश्वकप टी-२० स्पर्धेत सहजपणे जेतेपद पटकावले, तर तुम्हाला लवकरच सूर गवसला, असा प्रश्न विचारण्यात येईल. आम्ही जर अंतिम फेरीत पराभूत झालो तर फायनलचे दडपण पेलण्यास सक्षम आहात का, असा प्रश्न येईल. जर आम्ही पात्रता गाठण्यात अपयशी ठरलो तर मायदेशातील मैदानावर दडपण पेलण्यास सक्षम आहात का, असा प्रश्न उपस्थित होईल. त्यामुळे लोकांना प्रश्न विचारण्यापासून रोखता येईल, असे मला वाटत नाही. जर चांगले प्रश्न विचारण्यात आले तर मी नक्की उत्तर देईल.’’ भारताने ९ वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्या विश्वकप टी-२० स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. धोनी पुन्हा एकदा विश्वविजेतेपद पटकावण्यास उत्सुक आहे. या स्पर्धेच्या तयारीला बांगलादेशमध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेपासून प्रारंभ होणार आहे. भारताने आॅस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघांविरुद्ध टी-२० मालिकेत विजय मिळवत सूर गवसल्याचे सिद्ध केले आहे. धोनीने संघाच्या तयारीवर समाधान व्यक्त केले. धोनी म्हणाला, ‘‘आॅस्ट्रेलियामध्ये आम्ही तीन सामने खेळले, ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. तेथील परिस्थिती वेगळी होती, पण त्यानंतर आम्ही मायदेशात श्रीलंकेविरुद्ध खेळलो. त्यामुळे आम्हाला टी-२० क्रिकेटसोबत ताळमेळ साधण्यास मदत मिळाली. टी-२० क्रिकेटमधून कसोटी क्रिकेटमध्ये परतण्यापेक्षा कसोटी क्रिकेटमधून टी-२० क्रिकेटमध्ये परतणे सोपे असते. आम्हाला आॅस्ट्रेलिया व श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेच्यानिमित्ताने टी-२० क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. विश्वकप टी-२० स्पर्धेपूर्वी विशेष सामने खेळण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे काही सामने खेळण्याची आणि लय शोधण्याची संधी मिळाली, ही समाधानाची बाब आहे.’’भारत आशिया कप स्पर्धेत पहिली लढत २४ फेब्रुवारीस बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. आपल्या नेतृत्वाबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘‘मी शंभर टक्के पूर्वीप्रमाणेच आहे. माझे विचार व रणनीती यात बदल झालेला नाही. चॅम्पियन्स नशिबावर विश्वास ठेवत नाहीत.’’ वरच्या फळीत फलंदाजी करण्यास उत्सुक आहे का, याबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘‘सर्व काही सुरळीत असेल तर मला वरच्या फळीत फलंदाजी करण्याची गरज भासत नाही. कारण आमची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. आमच्या फलंदाजांनी चांगल्या भागीदारी केल्या आणि १८ ते १९ व्या षटकापर्यंत चांगली कामगिरी केली तर मी वरच्या फळीत फलंदाजी करू शकतो. याव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या परिस्थितीमध्ये वरच्या फळीत फलंदाजी करण्यास प्राधान्य देणार नाही. विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्यानंतर रैना, युवराज आणि मी सहाव्या क्रमांकावर येतो. त्यानंतर जडेजा व हार्दिक यांचा क्रमांक असतो, पण दरम्यान मोठी भागीदारी झाली तर आम्हाला फलंदाजी क्रमामध्ये बदल करण्याचा विचार करता येईल.’’(वृत्तसंस्था)नाणेफेकीचा कौल मिळविण्याबाबत नशिबाचा विचार करता येईल. दव पडणाऱ्या लढतीत खेळताना जर नाणेफेकीचा कौल गमाविला किंवा लढतीत पावसाचा व्यत्यय निर्माण झाला तर नशिबाचा हवाला देता येईल. पण हा खेळाचा एक भाग आहे, हे विसरता येणार नाही. माझ्या मते चॅम्पियन्सचे नशीब असा काही प्रकार मला मान्य नाही. ज्या वेळी नाणेफेक केली जाते त्या वेळी नशिबाचा समावेश असतो. संघाचे संतुलन साधण्यासाठी आशिया कप स्पर्धेत सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न राहील. प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न असला तरी सामना जिंकण्यास प्राधान्य राहील. आमच्यात प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जिंकण्याचा विश्वास व प्रतिभा आहे. भारतीय संघ प्रत्येक विभागात सरस अहे. प्रत्येक खेळाडू फिट असणे महत्त्वाचे आहे. जर सर्वांना खेळण्याची संधी मिळाली तर ती आमच्यासाठी चांगली बाब ठरेल. शेवटी मैदानावर चमकदार कामगिरी करणे आवश्यक आहे.- महेंद्रसिंह धोनीपदार्पणाच्या तुलनेत संघात पुनरागमन करणे कठीण बाब ठरली. हा चांगला अनुभव आहे. आम्ही दोघेही पूर्णपणे वेगळ्या शैलीचे गोलंदाज आहोत. आमची जोडी चांगली आहे. आगामी दोन महिन्यांत आमची कामगिरी उल्लेखनीय ठरेल. वेगवान गोलंदाजांसाठी कामगिरीत सातत्य राखणे आव्हान ठरते. संघात आत-बाहेर होत असल्यामुळे वेगवान गोलंदाजावर दडपण असते.- आशिष नेहरासचिन-सौरव या भारताच्या महान जोडीच्या यशापेक्षा अधिक यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मी व रोहित प्रदीर्घ कालावधीपासून डावाची सुरुवात करीत आहोत. आम्हाला एकमेकांच्या शैलीची चांगली कल्पना आहे. खेळपट्टी काय करण्यास उत्सुक आहे, याची मला कल्पना येते. आमच्या भात्यात अनेक फटके आहेत. त्यामुळे तो जर आक्रमक खेळत असेल तर मी स्ट्राईक रोटेट करण्याची भूमिका बजावू शकतो.- शिखर धवन
काही प्रश्न उत्तर बदलू शकत नाहीत
By admin | Published: February 22, 2016 3:52 AM