कानपूर : भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि कपिल देव यांनी रविवारी लोढा समितीच्या काही शिफारसी खूप कठोर असल्याचे म्हटले आहे. त्यात एक राज्य एक मत आणि प्रशासकांसाठी तीन वर्षांचा ब्रेक या बाबीचा त्यात समावेश आहे.गावसकर आणि कपिल यांच्याआधी कर्णधार रवी शास्त्री यांनीदेखील असेच मत व्यक्त केले होते. या दिग्गजांनी वादग्रस्त मुद्दे सोडवण्यासाठी लोढा समिती आणि बीसीसीआय यांच्यात चर्चा होण्याची वकिली केली होती. त्यांच्यानुसार काम करण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी बीसीसीआयची पद्धत वेगळ्या प्रकारची आहे आणि त्यासाठी समितीच्या सर्व शिफारसी या त्यांच्यासाठी लाभदायक नाहीत.गावसकर म्हणाले, ‘‘ज्या तीन व्यक्ती समितीत सहभागी होत्या आणि शिफारशी दिल्या त्यांचा मी पूर्ण सन्मान करतो. जे बीसीसीआयचे संस्थापक सदस्य आहेत त्यांच्यासाठी ‘एक राज्य, एक मत’ ही शिफारस कठोर आहे. तुम्ही इंग्लंडमध्ये जाल तर तेथे सर्वच काऊंटी इंग्लिश काऊंटी चॅम्पियनशिप खेळत नाहीत हे तुम्ही पाहाल. आॅस्ट्रेलियाच्या प्रथमश्रेणी चॅम्पियनशिपमध्ये सर्वच राज्य खेळत नाहीत. प्रत्येक राज्य रणजी ट्रॉफी खेळल्यास क्रिकेटचा दर्जा खालावेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आम्हाला मदत मिळणार नाही.’’भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीदरम्यान संजय मांजरेकर यांनी लोढा समितीच्या शिफारशींवर मत जाणू इच्छिले तेव्हा गावसकर म्हणाले, ‘‘सध्या तरी जेथे संघ ज्युनियर पातळीवर खेळत आहे आणि तेथे तुम्ही चांगले खेळले तर तुम्हाला पुढच्या स्तरावर पाठवले जात आहे. उदाहरण म्हणजे छत्तीसगडने ज्युनियर स्तरावर चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांना प्रमोट करण्यात आले आहे आणि हीच योग्य पद्धत आहे.
लोढा समितीच्या काही शिफारसी खूपच कठोर
By admin | Published: September 26, 2016 12:17 AM