ऑनलाइन लोकमत
बर्मिगहॅम, दि. 14 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून टीम इंडियाचा सामना उद्या बांगलादेशच्या संघासोबत होणार आहे. भारताचा डॅशिंग फलंदाज युवराज सिंगचा हा 300 वा एकदिवसीय सामना असणार आहे. यानिमित्ताने पत्रकारांशी बोलताना भारताच्या या स्टायलिश फलंदाजाने अजून काही वर्ष भारतासाठी खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
बर्मिगहॅममध्ये होणा-या या महत्वाच्या सामन्यापूर्वी युवराजने पत्रकरांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. 300 व्या सामन्याबाबत बोलताना युवराज म्हणाला भारतासाठी खेळायला सुरूवात केली त्यावेळी केवळ एक सामना खेळून मी खूप आनंदी झालो होतो. मला स्वतःचा खूप अभिमान वाटला होता. भारतासाठी खेळायला मिळाल्याने मी स्वतःला नशीबवान समजतो. संघातून बाहेर गेल्यानंतर पुन्हा भारतासाठी खेळण्याचा आनंद आहे, मी सध्या चांगला खेळत आहे, जोपर्यंत मी चांगला खेळत राहील मला भारतासाठी खेळायला आवडेल. आणखी काही वर्ष भारतासाठी खेळेल असा मला विश्वास यावेळी युवराजने व्यक्त केला. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून पुढे जाण हा माझ्यातला सर्वात मोठा गुण असल्याचं कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर मात करून पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा युवराज म्हणाला.
सेमीफायनलआधी युवराज सिंगने दाखवली सुपर पॉवर-
गुरुवारी भारत आणि बांगलादेशदरम्यान सेमीफायनल होणार आहे. दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी कसून सराव करत आहेत. दोन्ही संघाचे खेळाडू एकीकडे मैदानात घाम गाळत असताना युवराज सिंगने मैदानाबाहेर आपली सुपर पॉवर दाखवली आहे.
युवराज सिंगने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ म्हणजे बांगलादेश खेळाडूंसाठी एक चेतावणीच आहे. या व्हिडीओत युवराज सिंग आपल्याकडे सुपर पॉवर असल्याप्रमाणे आपोआप दरवाजा उघडत आहे, आणि बंदही करत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने हा व्हीडीओ शूट केला आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात उद्या गुरुवारी बर्मिंगहॅममध्ये उपांत्य सामना होणार आहे. या सामन्याआधी युवराज सिंहने हा विनोदी व्हिडीओ शेअर केला आहे. युवराज सिंग आपल्या विनोदी स्वभावासाठी ओळखला जातो. ड्रेसिंग रुममध्येही युवराज सिंग इतर खेळाडूंच्या खोड्या काढत असतो.