पाकिस्तानला पहिलेच सुवर्णपदक मिळाल्याने त्या देशात आनंदाची लाट आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अर्शद नदीमवर पैशांचा वर्षाव होत आहे. सुमारे ५० कोटी रुपयांची बक्षीसे अभिनेते, उद्योगपती, सरकार आदींनी जाहीर केली आहेत. यातच अर्शदला त्याच्या सासऱ्यानेही खास गिफ्ट दिले आहे.
अर्शदला एकीकडे करोड़ो रुपयांच्या भेटींनी गौरविले जात असताना सासऱ्याने त्याला म्हैस गिफ्ट करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानातील ग्रामीण परंपरेनुसार सासऱ्याने नदीमला म्हैस भेट देण्याचे ठरविले आहे. सासरे मोहम्मद नवाज यांनी मीडियाला सांगितले की, आमच्या गावात म्हैस भेट देणे खूप मौल्यवान आणि सन्मानाचे मानले जाते.
मला चार मुलगे आणि तीन मुली आहेत. त्यापैकी सर्वात लहान मुलगी आयशाचे लग्न नदीमसोबत झाले आहे. सहा वर्षांपूर्वी मुलीचे लग्न नदीमसोबत करम्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा नदीम छोटी-मोठी नोकरी करत होता. परंतू त्याला त्याच्या खेळावर विशेष प्रेम होते. घरी आणि शेतात तो सतत भालाफेकीचा सराव करत असायचा, असे सासऱ्यांनी सांगितले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रासमोर पदकाचा बचाव करण्याचे मोठे आव्हान होते. पण, पाकिस्तानच्या अर्शदने ऐतिहासिक कामगिरी करताना तब्बल ९२.९७ मीटर भाला फेकला. त्याने यासह ऑलिम्पिकमध्ये सर्वात दूर भाला फेकण्याचा विश्वविक्रम केला. भारताचा स्टार नीरज चोप्रा पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला होता. पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.४५ मीटर भाला फेकत हंगामातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.
अर्शदकडे चांगला भाला नव्हता...मार्च महिन्यात अर्शद नदीमने मीडियाशी बोलताना माहिती दिली होती की, माझा जॅव्हेलिन आता जीर्ण झाला आहे. राष्ट्रीय महासंघ आणि माझे प्रशिक्षक यांना मी कळवले आहे की पॅरिस ऑलिम्पिकच्या आधी याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. सुमारे २०१५ पासून मी हाच भाला वापरत असल्याने आता त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. एखाद्या ऑलिम्पिक स्पर्धेत अशा भाल्याने खेळणे शक्य नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर त्या दर्जाची साधने असणे आवश्यक आहे. पण माझ्याकडे तितके पैसे नाहीत, असे तो म्हणाला होता. त्याला नवीन भाला घेण्यासाठी ८५ हजार रुपयांची गरज होती.