- रोहित नाईक, नवी दिल्ली
आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या कबड्डी खेळाला वेध लागलेत ते आॅलिम्पिक प्रवेशाचे. कबड्डीप्रेमींनाही क्रीडा कुंभमेळ्यात आपल्या देशी खेळाचा थरार पाहण्याची उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय कबड्डी संघटना स्वत:हून पुढाकार घेत असून लवकरच येत्या काही वर्षांत कबड्डी आॅलिम्पिकमध्ये नक्की दिसेल. यासाठी आम्ही २०२० सालचे लक्ष्य ठेवले आहे, असा विश्वास भारताचे माजी कर्णधार व प्रो कबड्डी लीग तज्ज्ञ राजू भावसार यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.‘आॅलिम्पिक नियमांनुसार प्रत्येक खेळ ५ खंडांतील किमान ५-६ देशांमध्ये खेळला गेला पाहिजे. प्रो कबड्डीच्या माध्यमातून आज १०० देशांमध्ये कबड्डीचे प्रक्षेपण होत आहे. त्यामुळे आपोआप खेळाचा प्रसार होईल. सुरुवातीला परदेशात स्थायिक झालेले भारतीय कबड्डी खेळतील. त्यांना पाहून परदेशी लोक याकडे वळतील आणि हळूहळू हा खेळ खेळणाऱ्या देशांची संख्या वाढेल व एक वेळ अशी येईल की प्रत्येक खंडातील किमान ५-६ देशांत कबड्डी खेळताना दिसेल’, असे भावसार यांनी सांगितले. खेळांमध्ये झालेल्या व्यावसायिक क्षेत्राच्या पुढाकाराविषयी भावसार म्हणाले, ‘व्यावसायिक क्षेत्राची साथ प्रत्येक खेळासाठी महत्त्वाची आहे. नुसतं खेळ चांगला असून चालत नाही. तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळेच त्या खेळाची लोकप्रियता वाढून नवी गुणवत्ता मिळते. कबड्डीला व्यावसायिकतेची साथ मिळाल्याने खेळ टीव्हीवर आला आणि जबरदस्त क्रांती झाली. आज बहुतेक तरुण खेळाडू कबड्डीकडे करिअरच्या दृष्टीने पाहत आहेत. शिवाय इतर खेळांच्या तुलनेत कबड्डी खेळासाठी खर्च काहीच नसतो. व्यावसायिक क्षेत्राच्या मदतीमुळेच हे यश कबड्डीला मिळाले.’आमचे खेळाविषयी जे काही स्वप्न होते ते प्रो कबड्डीमुळे साकार झाले. मी खेळत असताना अशा प्रकारची लीग नव्हती याची खंत आहे. मात्र सल्लागाराच्या रूपाने याच्याशी जोडलो गेलोय यात समाधान आहे. स्पर्धात्मक कबड्डीत सातत्याने चमकदार कामगिरी केल्यास प्रो कबड्डीतील नवोदितांचा प्रवेश सुकर होईल. कारण आज संघाला गुणवान खेळाडूंची गरज आहे. - राजू भावसार, माजी कबड्डीपटू