ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - अनिल कुंबळेनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची निवड 10 जुलै रोजी होणार आहे. 10 जुलै रोजी इच्छुकांचे इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत अशी माहिती भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने दिली. गांगुली क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य आहे आणि प्रशिक्षकाची नेमणूक करण्याचा अधिकार या समितीकडे आहे. गंगुलीसह सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांचाही या समितीत समावेश आहे.
शनिवारी बंगाल क्रिकेट बोर्डाची बैठक झाली यावेळी गांगुलीने "या महिन्यात 10 जुलै रोजी मुंबईमध्ये प्रशिक्षकपदासाठी इच्छुकांचे इंटरव्ह्यू घेतले जातील" असं सांगितलं. पण प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा त्याचवेळी केली जाईल की नाही याबाबत त्याने माहिती दिलेली नाही.
भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक कोण होणार यावरुन रोज तर्क-वितर्क लढवले जात असून दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे. कर्णधार विराट कोहलीसाबोत झालेल्या वादानंतर अनिल कुंबळेने तडकाफडकी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर या शर्यतीत सामील झालेली रवी शास्त्री आणि वेंकटेश प्रसाद ही दोन नवी नावे आहेत. याशिवाय विरेंद्र सेहवाग, टॉम मुडी, लालचंद राजपूत अशी तगडी नावं या शर्यतीत आहेत.
सचिनच्या मध्यस्थीनंतर शास्त्री कोचपदासाठी अर्ज करण्यास तयार -
प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हस्तक्षेप केला आहे. सचिनने रवी शास्त्रीशी चर्चा केल्यानंतर रवी शास्त्री प्रशिक्षकपदासाठी अर्ज करायला तयार झाले. प्रशिक्षक निवडण्याच्या समितीमधील सदस्यानेच थेट शास्त्रींना अर्ज करायला सांगितल्याने शास्त्रींची अनिल कुंबळेंच्या जागी प्रशिक्षकपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
विराट - कुंबळे वादावर सौरभ गांगुलीचा मोठा खुलासा -
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने अखेर विराट कोहली - अनिल कुंबळे वादावर मध्यंतरी भाष्य केलं. हा वाद समजूतदारपणे हाताळला जाण्याची गरज होती असं मत सौरभ गांगुलीने व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे गांगुली क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य आहे. प्रशिक्षकाची नेमणूक करण्याचा अधिकार या समितीकडे आहे. या समितीत सौरभ गांगुलीसोबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मणचा समावेश आहे. हा वाद व्यवस्थित हाताळला गेला नसल्याचं सौरभ गांगुलीने सांगितलं आहे. ""विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यामधील वादामध्ये जो कोणी मध्यस्थी करत होता त्याने व्यवस्थित हाताळण्याची गरज होती. समजूतदारपणे हा मुद्दा हाताळण्यात आलेला नाही"", असं सौरभ गांगुली बोलला आहे.