ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 11 - विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अखेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात यश मिळवले. भेदक गोलंदाजीला भेटलेली चपळ क्षेत्ररक्षणाची साथ आणि माफक आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवनने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने आपल्या शेवटच्या साखळी लढतीत दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी राखून मात केली आणि दिमाखात स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 192 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्माच्या (12) रुपात पहिला धक्का बसला. मात्र शिखर धवन आणि विराट कोहलीने शानदार अर्धशतके फटकावत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची धार बोथट केली. या दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी 128 धावा जोडत भारतीय संघाला दीडशेपार नेले.
धवन आणि विराटची जोडी भारताला सहज विजय मिळवून देईल, असे वाटत असतानाच धवन ताहिरची शिकार झाला. धवनने 78 धावांची खेळी केली. अखेर विराट कोहली आणि युवराज सिंगने विजयाची औपचारिकता पूर्ण करत भारताला आठ गडी राखून विजय मिळवून दिला. विराट कोहली 76 आणि युवराज सिंग 23 धावांवर नाबाद राहिले.
तत्पूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील या निर्णायक लढतीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी जबरदस्त कामगिरी हा निर्णय सार्थ ठरवला. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 50 षटकही पूर्ण खेळता आली नाहीत. 44.3 षटकात आफ्रिकेचा अख्खा संघ केवळ 191 धावांत गारद झाला. भारताकडून बुमराह आणि भुवनेश्वरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर अश्विन, पांड्या आणि जडेजा यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं. विशेष म्हणजे आफ्रिकेचे तीन फलंदाज धावबाद झाले.
भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे सलामीवीर हाशिम अमला आणि डी-कॉक यांनी सावध सुरूवात केली होती. मात्र, 18 व्या षटकात अश्विनने अमलाला 35 धावांवर धोनीकरवी झेलबाद केले. तर चांगली फलंदाजी करणाऱ्या डी-कॉकला अर्धशतकानंतर रवींद्र जडेजाने त्रिफळाचीत केले. डी-कॉकने 53 धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेल्या डीव्हिलिअर्स आणि डुप्लेसिस ही जोडी जमली असे वाटत असतानाच डिव्हिलिअर्स 16 धावांवर धावबाद झाला तर त्याच्यानंतर आलेला मिलर हा देखील केवळ 1 धाव काढून धावबाद झाला. त्यानंतर मैदानावर जम बसलेला डु-प्लेसिस मोठी खेळी करेल, असे वाटत असतानाच 36 धावांवर हार्दिक पंड्याने त्याला त्रिफळाचित केले. दोन फलंदाज एकामागोमाग धावबाद आणि नंतर जम बसलेला डु-प्लेसिस बाद झाल्याने आफ्रिकेचा संघ अडचणीत आला. त्यांच्यानंतर एकाही खेळाडूला मैदानात तग धरता आला नाही. ख्रिस मॉरिस, फेलुक्व्वायो, रबाडा आणि मॉर्ने मॉर्केल यांनी केवळ हजेरी लावण्याचेच काम केले. अखेर त्यांचा संपूर्ण संघ 191 धावांत गारद झाला.