मुंबई : दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या भल्यामोठ्या आव्हानांचा पाठलाग करताना अखेरच्या षटकात कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि धडाकेबाज युवराज सिंग यांचे प्रयत्न अपुरे पडल्याने भारताला टी२० विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ धावांनी पराभव पत्करावा लागला. शिखर धवनने शानदार अर्धशतक झळकावले.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमान भारताला विजयासाठी १९७ धावांचे तगडे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळती झाली. रोहित शर्मा (१०), विराट कोहली (१) आणि अजिंक्य रहाणे (११) स्वस्तात परतल्याने ६.२ षटकांत भारताची ३ बाद ४८ अशी अवस्था झाली. मात्र, यानंतर सुरेश रैना (२६ चेंडंूत ४१ धावा) व धवन (५३ चेडंूत ७३ धावा) यांनी निर्णायक फटकेबाजी करताना भारताचे आव्हान कायम राखले. संघाच्या ३ बाद १४२ धावा झालेल्या असताना दोघेही निवृत्त झाले आणि धोनी - युवराज जोडीने आफ्रिकेवर दडपण आणण्यास सुरुवात केली. धोनीने पहिल्या चेंडूपासून हल्ला चढवत १६ चेंडूत ४ चौकार व एका उत्तुंग षटकारासह नाबाद ३० धावा कुटल्या. तर युवराजने ८ चेंडंूत प्रत्येकी एक चौकार व षटकार ठोकताना १६ धावा काढल्या. अखेरच्या षटकात विजयासाठी १४ धावांची आवश्यकता असताना दोघांची झुंज ४ धावांनी कमी पडली.तत्पूर्वी, सलामीवीर क्वांटन डीकॉक (३३ चेंडूत ५६ धावा) व जेपी ड्युमीनी (४४ चेंडूत ६७ धावा) यांच्या जोरावर आफ्रिकाने ८ बाद १९६ धावा उभारल्या. हाशिम आमला व फाफ डू प्लेसिस झटपट बाद झाल्यानंतर डॉकॉक आणि ड्युमीनी यांनी ७७ धावांची आक्रमक भागीदारी केली. यानंतर तळाच्या फलंदाजांनी संघाला दोनशेचा टप्पा गाठून देण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहम्मद शमी (२/३७) जसप्रीत बुमराह (२/५१) आणि हार्दिक पांड्या (३/३६) यांच्या माऱ्यापुढे आफ्रिकेच्या धावसंख्येला खीळ बसली. (क्रीडा प्रतिनिधी)संक्षिप्त धावफलक :दक्षिण आफ्रिका : २० षटकांत ८ बाद १९६ धावा (क्वांटन डीकॉक ५६, जेपी ड्युमिनी ६७; हार्दिक पांड्या ३/३६) वि.वि. भारत : २० षटकांत ३ बाद १९२ धावा (शिखर धवन ७३, सुरेश रैना निवृत्त ४१; इम्रना ताहीर १/२५)
दक्षिण आफ्रिकेची ४ धावांनी बाजी
By admin | Published: March 13, 2016 4:25 AM