नवी दिल्ली : जवळजवळ अडीच महिने कालावधीच्या दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ रविवारी भारतात दाखल झाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान २ आॅक्टोबर रोजी धर्मशाला येथे खेळल्या जाणाऱ्या टी-२० लढतीने या मालिकेची सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिका संघात एबी डिव्हिलियर्स (वन-डे संघाचा कर्णधार), हाशिम अमला (कसोटी संघाचा कर्णधार), फॅफ ड्यू प्लेसिस (टी-२० संघाचा कर्णधार) अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका संघाचे रविवारी दुपारी दिल्ली विमानतळावर आगमन झाले. संघातील खेळाडूंनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलण्याचे टाळले. संघासाठी चोख सुरक्षा व्यवस्था होती.दक्षिण आफ्रिका संघ या ७२ दिवसांच्या दौऱ्यात भारताविरुद्ध तीन टी-२०, पाच वन-डे आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. त्याचप्रमाणे पाहुणा संघ मंगळवारी भारतीय अध्यक्ष इलेव्हनविरुद्ध टी-२० सराव सामना खेळणार असून कसोटी मालिकेपूर्वी ३० व ३१ आॅक्टोबर रोजी मुंबई येथे दोन दिवसीय सराव सामना खेळणार आहे.(वृत्तसंस्था)
दक्षिण आफ्रिका संघाचे आगमन
By admin | Published: September 28, 2015 1:43 AM